लोक काय म्हणतील...
" अगं ,तुला बोलायला काय जातं...लोक काय म्हणतील... "
मोठा भाऊ तावातावात बोलत होता.
" अरे दादा, लोकांना काय बोलायचं ते बोलू दे.... लोक दोन्ही बाजूने बोलणारे असतात. लोकांचा विचार करून आपण आपल्या आईवर अन्याय करायचा का?"
शुभांगी समजावण्याचा स्वरात बोलत होती.
" असे प्रकार तुमच्या परदेशात होतात,त्यांना सवय असते या गोष्टीची,मनाची तयारी असते. या गोष्टीला लोकं वेगळ्या नजरेने बघतात. आई मुलांना जड झाली .. आईला एकाकी पाडलं मुलांनी..हेच ऐकायला मिळेल..लोक जाऊ दे पण आपले नातेवाईक शेण घालतील माझ्या तोंडात.."
" तू लोकांचा विचार करू नकोस....आपल्या आईचा विचार कर, तिच्या मनाचा विचार कर .काल मी आणि आई बराच वेळ बोलत बसलो होतो.
आईच्या मनात काय चालू आहे ते जाणून घ्यायचं होतं म्हणून मी तिच्या मैत्रिणींची विचारपूस केली. जोडीदाराच्या निधनानंतर बरेच जणींच्या आयुष्यात निराशा आली आहे. जोडीदार जाण्याचं दुःख आहे पण मुलांच्या घरी अवघडल्याप्रमाने राहण्याचे दुःख जास्त आहे. मुलं,सूना,नातवंडं सगळे प्रेमळ आहेत पण स्वावलंबन गमावल्याची भावना मनात आहे.."
शुभांगीचं बोलणं मध्येच तोडत दादा बोलला..
" आपल्याकडे आईला असं कधीच वाटणार नाही.. आपलं घर ते आईचच आहे ना.."
" दादा, माझा मुद्दा तुझ्या लक्षात येत नाही..
एवढे दिवस आई मुलांसाठी, नवऱ्यासाठी जगली ,आता तिला तिच्यासाठी जगू दे ना....
आपल्या घरी ती आली तर आपण कितीही नाही बोललो तरी थोडी खाण्या-पिण्याची, झोपण्या - उठण्याची, बाहेर फिरायला जाण्याची बंधनं तिच्यावर नकळतपणे येतील..
मला वाटतं आपण परत एकदा तिला तिच्या मनाप्रमाणे जगण्याची संधी द्यावी..
"मला तुझा मुद्दा पटतोय पण मी तरी आईला एकटी ठेवण्याचा निर्णय मी घेऊ शकत नाही..लोक काय म्हणतील.."
आतमध्ये बसून मुलांचं बोलणं ऐकणारी आई दादाचं बोलणं ऐकून बाहेर येत बोलली..
" लोकांना काय बोलायचं ते बोलू दे.. लोकं दोन्ही बाजूने बोलणारे असतात. मी तुमच्याकडे रहायला आली तर मी परावलंबी कशी आहे याबद्दल मला सहानुभूती दाखवतील व एकटी राहिली तर माझे तुमच्या विरुद्ध कान भरतील.
माझे एवढे वर्ष जबाबदारी घेण्यात गेले, तुमच्या बाबांचा स्वभाव तुम्हाला माहितीच होता...वाद नको म्हणून तुमच्या पासून विभक्त राहिलो .प्रत्येक गोष्ट त्यांच्या कलेनी घेत आले ..
आता तुझ्या बाबांच्या निधनानंतर मला माझ्या आवडी प्रमाणे जगण्याची इच्छा आहे.
तुमच्याकडे आल्यावर तुम्ही प्रेमाने करणार याची मला खात्री आहे . जोपर्यंत माझे हात पाय चालतील तोपर्यंत मी विभक्त रहाणेचं पसंत करेन.."
दादाला आईचं मन कळतं होतं पण लोकांचा विचार मनात आला की, निर्णय घ्यायला मन मागे - पुढे पहात होतं..
शुभांगीने दादा समोर एक पर्याय ठेवला, बाबांच्या वर्षश्राद्ध होई पर्यंत आपण आई कशी रुळते बघू ..आपल्याला वाटलं की, ती खुश नाही त्यावेळी आपण तिला आपल्या सोबत ठेवू..
दादा कसाबसा तयार झाला.
आज वर्षश्राधासाठी सगळी पाहुणे मंडळी , मित्र परिवार जमला होता. सगळ्या विधी संपल्या नंतर संध्याकाळी आईने शुभदाचा हात हातात घेत आई बोलली ," विभक्त राहण्याचा धाडसी निर्णय मी कधीच घेऊ शकली नसती पण तू मला साथ दिली माझं मन ओळखलंस त्यामुळे मी माझं खरं जीवन जगू शकले . माझ्या आवडी - निवडी जाणून घेऊन शकले. माझा आदर्श घेऊन कितीतरी समवयस्क मंडळी स्वाभिमानाने विभक्त राहून आनंदाने जगत आहे "आईच्या चेहऱ्यावर वेगळाच आत्मविश्वास झळकत होता.
"लोक काय म्हणतील..." असा विचार करुन आपण आपल्याच आई - बाबाचे जीवन त्यांच्या पासून हिरावून घेतो...
आई किंवा वडिलांची जोडीदाराच्या निधनानंतर एकटे राहण्याची इच्छा असेल तर त्यांना स्वतंत्रपणे व स्वाभिमानाने विभक्त राहू देण्यास काहीच हरकत नाही. लोक काय म्हणतील .. असा विचार केला तर त्या व्यक्तीला पारतंत्र्यात ठेवल्या सारखे होईल
एकत्र राहून बंधनात राहण्यापेक्षा विभक्त राहून आनंदाने जगणे कधीही चांगलेच..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment