मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

रविवार, २ जुलै, २०२३

गृहीत धरलेले प्रेम



गृहीत धरलेले प्रेम

 " बाबा मला खात्री होती तुम्ही मला भेटायला नक्की येणार,तुमचे आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी आहेतच.. ."

मुलीचे हे शब्द श्रीधररावांच्या कानात घुमत होते. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या माझ्या मुलीने मला इतकं गृहीत धरलं आहे की, चुकीच्या वाटेवर चालताना माझ्या घरातल्या संस्करा पेक्षा बापाचं आंधळं प्रेम तिची सोबत करायला येईल..

"नेमकं माझं काय चुकलं..."असा विचार करत डोळे बंद केले . डोळ्यासमोर मागची वीस वर्ष उभे राहिले..

पहिली बेटी धनाची पेटी असते पण त्यापेक्षा मला देवाने काहीतरी जास्तच दिलं आहे अश्या आनंदात होतो. मुलीचे भरभरून लाड करत होतो. तोंडातून काढलेली प्रत्येक गोष्ट तिच्या समोर हजर असायची. बोबडे बोल बोलणारी बाबांच्या अंगाखांद्यावर खेळणारी छकुली कधी मोठी झाली ते कळलेच नाही. दहावी चांगल्या गुणांनी पास झाली. शाळेत बक्षीस वितरण चालू होतं, मुलीचं नाव पुकारताच डोळ्यात आनंद अश्रू आले, आपल्या मुलीला खूप शिकवायचं असं मनाशी पक्के ठरवूनच घरी आलो होतो.

गावात शिक्षणाची सोय नाही त्यामुळे पुण्याला तिच्या शिक्षणाची सोय केली.मुलगी दूर जाणार ही कल्पनाच सहन होत नव्हती पण हृदयावर दगड ठेवून मुलीला निरोप दिला..

बारावीला  पास झाली म्हणून तिला मोबाईल घेऊन दिला.  खूप दिवसानंतर भेटणाऱ्या बाबा सोबत गप्पात रमणारी छकुली आता मोबाइल मध्ये रंगून गेली...

मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. दिवसातून दोन वेळा फोन करणारी छकुली आता मोबाइल असताना आठवड्यातून एकच फोन करत होती..

मुलगी अल्लढ आहे , अभ्यासात वेळ मिळत नसेल म्हणून कानाडोळा केला. सुट्टीत घरी येणारी छकुली आता बहाणे सांगून तिथेच रमत होती..

उद्या मुलीचा वाढदिवस आहे तिला सरप्राइज देऊ असं म्हणून अचानक बाबा मुलीच्या रुमवरती गेले. तिथे गेल्यावर कळलं मुलीने आठ दिवसापूर्वी रूम सोडली आहे.  हे ऐकताच डोळ्यासमोर अंधारी आली.मुलीचा फोन लागत नव्हता म्हणून तिच्या मैत्रिणीला फोन केला, प्रत्यक्ष जावून भेट घेतली त्यावेळी कळलं की, छकुली एका इंटरनेटच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका मुलाच्या प्रेमात पडली आहे जो तिच्याच वयाचा आहे. ती त्याच्या फोटोला , मेसेजला भाळली आहे. मुलाचा खोटेपणा अजून तिच्या लक्षातच येत नाही.

मुलीचं तरुण वय आहे ,प्रेम आंधळं असतं म्हणून माफ करायचं ठरवलं पण पुढचं ऐकून पायाखालची जमीनच सरकली..

मुलाने शिक्षण सोडले आहे . मुलाचे वडील खाजगी बस चालवतात .मुलाच्या वडिलांनी दोन लग्न केले आहेत पण आता सध्या मुलगा व बाप दोघेच राहतात. एका चाळीत त्यांची स्वतःची एक खोली आहे.

हे सर्व ऐकताना अंगावर काटा आला.  कानावर विश्वास नव्हता म्हणून डोळ्यांनी  बघण्यासाठी व मुलीला परत घरी घेऊन येण्यासाठी एक लाचार बाबा निघाला होता. राजकुमारी प्रमाणे वाढवलेल्या मुलीला आता या दलदलीत राहताना बघून काळजाचं पाणी झालं.

मुलीकडे बघुन राग करावा की, या दलदलीतून बाहेर काढावं काहीच कळत नव्हतं. भावनाना आवर घालत फक्त एकच शब्द बोललो," चल, मी तुला न्यायला आलो आहे."

छकुलीने येण्यास साफ नकार दिला. वीस वर्षाच्या प्रेमावर एका वर्षाच्या प्रेमाने विजय मिळवला.

गृहीत धरलेल्या प्रेमाने लज्जित होऊन पाठ फिरवली व आपलं काय चुकलं याचा विचार करू लागलो..

एका बापाने मुलींचे नको तेवढे लाड केले, तोंडातून काढलेली प्रत्येक गोष्ट उभी केली. संस्कार, रिती- रीवाज याचा विचार न करता बंधन मुक्त करून आधुनिक पद्धतीचा स्वीकार केला.

हे इंटरनेटचं जाळ इतकं भयानक असू शकतं याची कल्पनाच नव्हती. रक्ताच्या नात्याला विसर पाडून एका आभासी जगात वावरणार असू शकतं...

मुलीवर नको तेवढा विश्वास ठेवला. ....

माझी छकुली अशी वागू शकते असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते..

आज सगळे दुःख गिळून तिला घ्यायला गेलो तर मला बोलते

"बाबा मला खात्री होती तुम्ही मला भेटायला नक्की येणार...माझं राज वरती खूप प्रेम आहे , आम्ही तो सेटल झाल्यावर लगेच  लग्न करणार आहोत ... तुम्ही काळजी करू नका...तुमचे आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी आहेतच... "

लग्न न करता मुलगी एका मुलासोबत रहाते हा विचार करून मनाला जे चटके बसतात ते फक्त एक बापच समजू शकतो...




७ टिप्पण्या:

  1. अगदी बरोबर लिहिले आहे मुलांना सोयी सुविधा देताना विचार करायला पाहिजे

    उत्तर द्याहटवा
  2. असा ही एक पेहेलू जीवनाचा असू शकतो, हे दाखवणारी सुंदर कथा.👌

    उत्तर द्याहटवा
  3. मुलीनी वडिलां ना समजून घेणे ही काळाची गरज आहे

    उत्तर द्याहटवा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template