*चांद्रयान आणि भारतीय अस्मिता*
"भारताची अवकाश संशोधन संस्था म्हणजेच ISRO एका महत्वपूर्ण मोहिमेचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. इस्रोसोबतच संपूर्ण भारताचं स्वप्न असलेलं चांद्रयान -3 लवकरच अंतराळात झेपावणार आहे."
वरील बातमी वाचताच मला चांद्रयन २ च्या वेळी भारतीयांची मनस्थिती झाली होती ती त्यावेळी शब्दात मांडली होती . जुना फोटो अल्बम काढून बसल्यावर ज्या भावना येतात त्या हा माझाच लेख वाचताना आल्या ..
" चांदोबा, चांदोबा रागावलास का.?
विक्रमला कुठेतरी लपवलंस का..?
विक्रमला लवकर शोधून आन...
आमची भेट घडवून आण्... "
भारतमाता आपल्या भावाला म्हणजे चांदोबाला विनवणी करते," माझी मुलं मी तुझ्याकडे पाठवली आहेत त्यातला विक्रम हरवला आहे आम्ही सर्वजण खूप काळजीत आहोत तर कृपया त्याला शोधून काढ."
आम्हा भारतीयांना लहानपणापासून चांदोमामाचं खुप कौतुक आहे.त्याचा चिरेबंदी वाडा पाहण्याची आम्हाला खूप उत्सुकता आहे. आम्हाला तूप रोटी खाऊन पहायची इच्छा आहे.
आम्हाला चंद्राला जिंकायचं नाही तर आम्हाला त्याची भेट घ्यायची आहे.
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आपलं डोकं लावून, ज्ञान पणाला लावून चांद्रयान पाठवलं आहे पण आम्ही सामान्य भारतीय आमचं मन व आमची कल्पना शक्ती चांद्रयान मध्ये पणाला लावली आहे.आम्हा भारतीयांच्या अस्मिता चांद्रयान दोन शी बांधल्या गेल्या आहेत.
प्रत्येक सजीव, निर्जीव वस्तू सोबत आम्ही नातं जोडतो असच नातं चांद्रयान दोन सोबत पण जुळल आहे. जेंव्हा विक्रमशी संपर्क तुटला त्यावेळी आमचा पोटाचा मुलगा हरवल्याचा भास झाला. चांद्रयान २ या निमित्याने आम्ही परत एकदा जगाला दाखवून देणार आहोत की, आम्ही पण कमी नाही.
सात ऑगस्टची रात्र म्हणजे आमच्यासाठी सुवर्ण क्षण होता. भलेही आमच्या शास्त्रज्ञांचे प्रयत्न कमी पडले असतील पण त्या रात्री आम्हाला उत्सुक ,कावरे बावरे , चिंताक्रांत, निराश चेहरे पहायला मिळाले आणि यात मुखवटे नव्हते तर ते खरे भाव होते. हे भाव फक्त इस्रो कार्यालयातील लोकांच्या चेहऱ्यावरील नव्हे तर लाखो लहान मोठ्या भारतीयांच्या चेहऱ्यावरील होते. कुटुंब प्रमुखाने जशी संकटाच्या काळात सदस्यांची काळजी घ्यावी त्यांना प्रोत्साहन द्यावे तसे आमच्या पंतप्रधानांनी त्यावेळी दिले. त्यावेळी आम्ही सर्व भारतीय भरून पावलो. चांद्रयान वरती घातलेले पैसे वाया नाही गेले ते यावेळी खरे कामी आले.
भारतीय लोकांचे प्रयत्न,भावना या प्रामाणिक आहेत.आमच्या अस्मिता चांद्रयान दोन शी बांधल्या गेल्या आहेत तर आज ना उद्या त्या सफल होणार यात काही शंकाच नाही."
आज १४ जुलै २०२३ रोजी अश्याच भारतीयांच्या अस्मिता चांद्रयान ३ विषयी आहेत त्यामुळे हि मोहीम यशस्वी होणारच ...
कृत्तिका कुलकर्णी
अंबरनाथ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment