क्षणिक पण लक्षात राहिलेल्या ओळखी
ही २०१३ - २०१४ ची गोष्ट आहे . माझ्या बाबांच्या पोटात अल्सर फुटला होता त्यामुळे खूपच नाजूक परिस्थितीत ऑपरेशन झालं होतं . डॉक्टर कसलीच खात्री देत नव्हते . ऑपरेशन नंतर कितीतरी दिवस ते ICU मध्ये होते . ICU मध्ये नातेवाईकांना यायला परवानगी नसते त्यामुळे आम्ही दिवस रात्र बाहेर बसून असायचो . डॉक्टरांकडून आम्हाला बाबांची तब्येत कशी आहे ते कळत असे . डॉक्टर राऊंडला कधी येतील व काय सांगतील याचीच वाट आम्ही पाहत असायचो . डॉक्टरांनी सांगितलं तब्येतीत सुधारणा आहे तर माझा चेहरा फुलायचा मला खूपच आनंद होत असे पण जर डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली तर मला अक्षरशः रडायला येत असे . त्या काळात मनाची खूपच चलबिचल अवस्था होत असे . आमच्या सोबतच ICU बाहेर वाट बघणारे पुष्कळ लोकं होती जी आपल्या रुग्णांची तब्येत कशी आहे याची वाट बघत असायचे . माझ्याच शेजारी असलेल्या एका मध्यम वयीन बाईने माझी चौकशी केली , रुग्ण तुमचे कोण आहेत , कुठून आला आहेत वैगेरे . त्यांनि एक मोलाचा सल्ला दिला ,"आपल्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येत असतात. या प्रसंगाला धीराने सामोरे जायला हवं . दुःखाच्या व आनंदाच्या क्षणी आपला समतोल राखायला शिक .. " तू रोज योग कर " "
हे शब्द साधेच होते , सल्लाही सामान्यच होता पण त्यांचे शब्द माझ्या मनाला भिडले . आमची ओळख नाही , नाव - गाव माहित नाही , पण त्यांचे शब्द अंतर्मनात घर करून बसले . थोडेच दिवसांत बाबा बरे होऊन घरी आले .
माझे योगशिक्षिका होण्याचे बीज कदाचित या ओळखीतच रुजले असेल ..
या नंतर माझे बाबा आजारी झाले खूपच नाजूक परिस्थिती निर्माण झाली. प्रत्येक वेळी मनाचा समतोल राखला पण ती क्षणिक पण कायम लक्षात राहणारी ओळख माझ्या अजूनही स्मरणात राहिली आहे .
Khup sundar
उत्तर द्याहटवा