बाहेर जोरदार पाऊस पडत होता त्यामुळे रवीच्या ऑफिसने त्याला वर्कफ्रॉम होम करण्याची मुभा दिली होती. अश्या वातावरणामध्ये आईच्या हातची गरमगरम भजी मिळाली तर .. स्वर्गसुख .. पण भजी आता मिळणं अशक्य आहे हे रवीला माहित होतं कारण रिया आज कामात व्यस्त होती. आईला फोन केला ,” आज तुझ्या हातच्या भजीची खूप आठवण येत आहे म्हणून तुला सकाळीच फोन केला . आज काय स्पेशल?”
“ आज आषाढ तळतेय. तुझी खूप आठवण आली . तुला फोन करणारच होती येवढ्यात तुझा फोन आला…”
फोनवरती बोलून झाल्यावर रवीला आता भजी विसरून आषाढ खाण्याची तीव्र ईच्छा झाली !!
“आषाढ तळणं” हा शब्दच तो विसरून गेला होता. आषाढ तळणं हा आपल्या लहानपणी आवडीचा प्रकार
आपण अनुभवलेले हे खाद्य संस्कृतीतील प्रकार कालबाह्य होत चालले आहेत हे लक्षात येताच रवीने संध्याकाळी आषाढ तळन्याचा घाट घातला. रवीची बायको मुंबईची त्यामुळे तिला हा प्रकार माहित नव्हता. पप्पा काहीतरी नवीन रेसिपी करणार म्हणून मुले खूष होती.
संध्याकाळी संपूर्ण कुटुंब स्वयंपाकघरात गोळा झालं . चिनू बोलला
“ पप्पा , तू काय फ्राई करणार आहेस?”
“ मला माहीत आहे पप्पा आज आ- षा- ढ फ्राई करणार आहे .”
मिनू आनंदाने पप्पाकडे पाहत बोलली
रवीची बायको रिया कढई मध्ये तेल ओतत बोलली “ तू नक्की काय तळणार आहेस ? खूप तेलकट नको करू म्हणजे झालं..तुझ्या पोटाकडे पाहून बनव जे बनवायचं आहे ते”
“ हो गं बाई.. या महिन्यात तेलकटं पदार्थ बाधत नाही. काळजी करू नको .”
रवी खाली मांडी घालून मुलाना जवळ घेत बोलला .”सांगतो सांगतो..आषाढ तळणे म्हणजे नक्की काय असतं
माझी आई दरवर्षी आषाढ तळत असे.
प्रत्येक महिन्याची काही ना काही खासियत असतेच.
बदलत्या महिन्यानुसार आहार, विहार या सगळ्यामध्ये बदल होत असतात.
हा आखाड तळणे किंवा आषाढ तळणे म्हणजे काय तर
आषाढ महिना सुरु झाला की, या दिवसात जास्तीज जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात.
मे महिन्यात बनवलेल्या पापड आणि कुरड्या तळून अगदी आवर्जून खाल्ले जातात.
आषाढ महिन्यात कधीही तुम्ही मस्त तळलेले पदार्थ खाऊ शकता.
आषाढात तळलेले पदार्थ खाणे यालाच आषाढ तळणे असे म्हणतात.
खूप जणांकडे आषाढ महिन्यात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे.
खास या दिवशी जावयाला घरी बोलावून चमचमीत पदार्थांचा मान दिला जातो.
तर काही ठिकाणी मुलीला माहेरी नेऊन मग तिच्यासाठी खास तेलकट पदार्थ दिले जातात. तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी असे पदार्थ दिले जातात.”
“ पण, मी म्हणते याच महिन्यात का? आपण कधीही असे पदार्थ बनवू शकतो ना..”
“आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते.
कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते. शरीराला दूषित पाणी मिळाले तर आरोग्य बिघडते.
त्यामुळे शरीराला वंगण मिळावे यासाठीही तेलकट पदार्थांचे सेवन या महिन्यात केले जाते.
तेलकट आणि गरम पदार्थ हे शरीराला या काळात गरम ठेवण्याचे काम करत असतात. त्यामुळेच या काळात पदार्थ तळले जातात.
पावसात अनेकदा आपल्याला चमचमीत असे खाण्याची इच्छा होते. उन्हाळ्यात आधीच आपल्या घरात पापड, लोणची अशी बनवलेली असतात. त्यामुळे बाहेर न खाता घरचे पदार्थ खाण्यासाठी तळणीचे पदार्थ केले जातात.
आषाढ महिन्यात चयापचय क्रिया ही देखील चांगली असते. आपण खाल्ल्ले पदार्थ चांगले पचतात. त्यामुळेही असे पदार्थ खाल्ले जातात.
आषाढ तळण्यात , चकली , शंकरपाळे, सांजोऱ्या, तिखट मिठाच्या खमंग पुऱ्या तळल्या जातात. हे केलेले पदार्थ देवाला नव्यैद्य दाखवले जातात व शेजारी आवर्जून दिले जातात. घरी बनवलेल्या या आषाढाचा मनसोक्त आनंद घेता येतो.”
आज घरी बनवलेले हे पदार्थ खाण्यात व गप्पा टप्पा , आठवणी मध्ये रवीचा परिवार रंगून गेला.
आपल्या मराठी महिन्याने विज्ञानाची जोड देत सणवार व खाद्य पदार्थांची सांगड घातली आहे.
सहा जुलै पासून आषाढ महिना सुरु झाला आहे . कोलेस्ट्रोल वाढण्याची भीती न बाळगता , आपल्या कुटुंबासोबत आषाढ तळण्याचा व खाण्याचा मनमुराद आनंद लुटा…
👌👌
उत्तर द्याहटवा