सईचा अनोखा खेळ
सई, आमच्या गल्लीतल्या मुलांची आवडती होती. प्रत्येक संध्याकाळी ती आणि तिचे मित्र मैत्रिणी घराच्या बाहेर खेळण्यासाठी जमायचे.
एके दिवशी सईने एक नवीन खेळ सुचवला. तिने आपल्या मित्रांना सांगितलं, “आपण आज ‘गुपचुप गल्लीतल्या भुतांचा शोध’ खेळूया.” सर्वांनी उत्साहाने तिला विचारले, “तो कसा खेळायचा?”
सईने सांगितलं, “आपण गल्लीतल्या प्रत्येक घराच्या मागे जाऊन तिथे लपलेलं भूत शोधायचं. ज्याला भूत सापडेल, तो विजेता होईल”.
सर्वांना हा खेळ खूप आवडला आणि सर्वांनी धावतपळत खेळायला सुरुवात केली. प्रत्येकाने दिवसा उजेडी हातात टॉर्च घेतला आणि गुपचुप घरांच्या मागे जाऊन भूत शोधू लागले. प्रत्येकजण मन लावून भूताचा शोध घेत होतं.त्यांना हसत-खेळत वेळ कसा गेला कळलंच नाही.
सईच्या मित्राने एका मोठ्या झाडामागे काही हालचाल पाहिली. तो पटकन तिथे गेला आणि पाहिलं की तिथे पांढऱ्याकेसांची हालचाल होते व कुरुमकुरुम आवाज येतोय , सईचा मित्र हळूच जाऊन त्या भूताला पकडला पण ते भूत नसून सावंतआजोबा होते , घरच्यांना चोरून जिलेबी खात होते. कोणालाही सांगणार असे सांगून दोघंनी मनसोक्त जिलेबिचा आस्वाद घेतला.
या खेळांमध्ये कोणाला चोरून धूम्रपान करणारा दादा मिळाला तर कोणाला प्रेम प्रकरण करणारी ताई मिळाली. खरी चोरी पकडली ती खाष्ट व खबरी माने काकूंची, भिंतील कान लावून लोकांच्या घरी डोकावण्याची त्यांची सवय मुलांनी हेरली.
मुलांच्या या खेळाची या पकडल्या गेलेल्या लोकांना कोणासोबत वाच्यता करता येत नव्हती त्यामुळे हे लपून बसलेलं भूत मूग गिळून बसलं होतं उलट या भूतानकडून मुलांना छान छान खाऊ मिळाला.
या खेळात कोणीच जिंकले नाही , पण सईने सांगितले, “आजच्या खेळात भूत नव्हतं, पण उद्या आपण नवीन काहीतरी शोधूया.”
त्या रात्री सर्वजण हसत-खेळत आपआपल्या घरात परतले. सईच्या खेळामुळे सर्वांची संध्याकाळ खास झाली होती. त्या दिवसापासून सईच्या गल्लीतले खेळ अधिक भन्नाट आणि मजेशीर बनले.
अशा प्रकारे सई आणि तिचे मित्र-मैत्रिणी रोज काहीतरी नवीन खेळ खेळत, आनंदाने आणि उत्साहाने आपलं बालपण जगत होते. त्यांच्या खेळांतून मैत्रीची आणि साहसाची नवी नाती जुळत होती.
कृतिका नितीन कुलकर्णी
अंबरनाथ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment