“गरबा” हा शब्द संस्कृतमधील “गर्भ” या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ आहे “गर्भ” किंवा “मध्यभागी काहीतरी”. ज्यामुळे जीवनचक्राचा प्रतीकात्मक अर्थ तयार होतो. त्यामुळे “गरबा” म्हणजे गर्भ किंवा दीपाभोवती साजरा केला जाणारा नृत्यप्रकार, जो सृजनशक्तीचा आणि देवीच्या उपासनेचा प्रतीक आहे.
या नवरात्रीच्या काळात ट्रेन मध्ये जाताना दोन वेगळ्या प्रकारचे संवाद कानावर पडले ..
" काय, कधी जातेस गरब्याला? तझा नेहमीचा ग्रुप जमत असेल ना?"
" खरं सांगायचं तर या वर्षी फारसा उत्साह वाटत नाही. गरबा खेळायला जायचं मनात नाहीय."
" काय? तू आणि गरब्याला नाही जाणार? आश्चर्यच आहे! नेहमी तर तू पहिली असायचीस. काय झालं अचानक?"
" सगळं फार बदललंय, मीनल. आधी गरबा म्हणजे देवीची उपासना, साजरा करणे यासाठी असायचं. आता तर सगळं स्पर्धा आणि दिखावा झालंय. लोक कपड्यांवर, मेकअपवर एवढा खर्च करतात, नुसता स्टेटस दाखवण्यासाठी. या सणाची साधेपणा हरवल्यासारखी वाटते".
" हो, काही अंशी बरोबर आहेस. हल्ली बऱ्याच लोकांचं लक्ष नुसत्या फॅशनवर आणि सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठीच असतं. गरब्याच्या मूळ भावनेपेक्षा प्रदर्शन जास्त महत्त्वाचं झालंय."
"नुसतं तेच नाही, मीनल. लोक ढोल वाजवत नाचतात, पण त्यात खरी भक्ती किंवा उत्सवाचा आनंद कमी जाणवतो. त्याऐवजी सगळीकडे स्पर्धा असते—कोणाचा ड्रेस सुंदर, कोण चांगलं नाचतं. कधी कधी वाटतं की, गरबा ही केवळ एक दिखाव्याची जागा बनलीय."
"हो, हे मात्र खरं आहे. सगळं सोशल मीडियासाठीचं असतं असं वाटतं. नवरात्रीच्या नऊ दिवसांत लोक पुजा कमी आणि फोटोशूट जास्त करतात."
"अरे, आणि आणखी एक गोष्ट म्हणजे, हल्लीच्या गरब्यांमध्ये संगीतही बदललंय. पारंपरिक गाणी ऐकायला मिळतातच नाहीत. त्याऐवजी बॉलिवूड गाणी वाजवतात. गरब्याची ती पारंपरिक भावना कुठे गेलीय?"
" हो, अगदीच! आधी गरबा म्हणजे एक साधी, भक्तीपूर्ण परंपरा होती. आणि हल्ली…कधी कधी हा सणच व्यावसायिक बनलाय असं वाटतं."
"म्हणूनच या वर्षी मला काही खास आकर्षण वाटत नाही. नुसता दिखावा करायचा सण म्हणून काहीतरी करण्यापेक्षा घरीच बसून देवीची मनोभावे पूजा करावी असं वाटतं."
त्या दोघी स्टेशन आल्यावर निघून गेल्या गेल्या मलाही त्यांचं म्हणणं पटलं .
आता आमच्या सोसायटी मध्ये आणखीन एक संवाद कानावर पडला ..." अरे वाह, सारा! तू तयारच झालीस वाटतं! किती सुंदर दिसतेय तू या घागराचोलीत.""थॅंक यू प्रिया! तूही कमाल दिसतेस. हा पिवळा रंग तुला अगदी शोभतोय. गरब्याला रंगांचं किती महत्त्व आहे ना!"हो , ना! आणि नवरात्रीत वेगवेगळ्या रंगांचे ड्रेस घालायला किती मजा येते. आजचा रंग पिवळा, म्हणजे आनंद आणि सकारात्मकतेचा प्रतीक."" अगं, आणि गरब्याची तर वेगळीच मजा असते. ढोलच्या तालावर नाचताना आपलीच एक वेगळी ऊर्जा असते. किती दिवसांपासून वाट पाहत होते याची!"" खरंच! एकत्र गरबा खेळायला जाणं, सगळ्यांनी मिळून मस्तपैकी फेर धरून नाचणं, हे नवरात्रीतलं सर्वात खास असतं. वर्षभराचं सगळा तणाव, थकवा निघून जातो "" हो, नुसतं नाचणं नाही तर देवीची आराधना आणि तिच्या शक्तीचं स्मरणही करतो आपण. गरबा म्हणजे फक्त एक नृत्य नाही, तर एक प्रकारे देवीची उपासना आहे."" बरोबर म्हणतेस. आणि ती जोडीला गरबा गाणी, उफ! किती ऊर्जा असते त्यात. “ढोलिडा, ढोल रे वागडो…” वाजलं की पाय आपोआप थिरकायला लागतात."" अगदी! आणि लोकांची गर्दी, झगमगणारे कपडे, सगळीकडून फक्त आनंद आणि उत्साह. याचं वर्णन करणं अवघडच आहे."" चला, मग उशीर करू नको. सगळे जमत असतील. आज रात्री मस्त गरबा खेळूया. स्पर्धेत जिंकायचं आहे, हे लक्षात आहे ना?""हो हो, लक्षात आहे. तयारी तर पूर्ण केलीय. आजचं डान्सिंग भारीच होईल!"दोघी हसत, आनंदात गरब्याच्या कार्यक्रमाला गेल्या .व्यक्ती तितक्या वल्ली , हाताची बोटे एकसारखी नसतात , ज्याचा त्याचा दृष्टिकोण वेगळा असतो या सर्व गोष्टी मान्य आहेत पण समाजाचा आपण घटक म्हणून याला कोणत्या नजरेने पहायचे ते आपण ठरवले पाहिजे.
कधी कधी हे सगळं अतिशयोक्तीपूर्ण आणि निसर्गापासून दूर वाटतं. पण तरीही, कदाचित आपण काही बदल घडवू शकतो. आपली साधेपणा आणि भक्ती कायम ठेवत गरबा खेळायचं ठरवलं तर?
खूप चांगले परिणाम आपल्या समाजावर होतील . भारताची संस्कृति हल्लीची पिढी विसरत चालली आहे हे बोल आपण लावतो पण पारंपरिक सणाला आधुनिकतेची सांगड घातली तर आनंदच आनंद आहे .
तरुण पिढी गरब्याच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीशी जोडली जाते. पारंपरिक वेशभूषा, गरब्याची गाणी, आणि ढोलच्या तालावर नाचणे यामुळे लोक आपल्या सांस्कृतिक मुळांना धरून राहतात
गरबा हा एक सामाजिक कार्यक्रमही आहे. तो खेळताना लोकांना एकत्र आणण्याची क्षमता आहे. विविध वयोगटांतील, धर्मांतील, आणि समाजातील लोक एकत्र येऊन गरबा खेळतात. त्यामुळे समाजात एकता आणि बंधुभाव निर्माण होतो. मोठ्या शहरांमध्ये सणाच्या वेळी होणाऱ्या गरबा कार्यक्रमांमध्ये विविध पार्श्वभूमीचे लोक एकत्र येतात, ज्यामुळे सामाजिक ऐक्य वाढतं.
गरबा नृत्य हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत दररोज गरबा खेळण्यामुळे शरीराला आवश्यक व्यायाम मिळतो. हल्लीच्या तणावपूर्ण जीवनशैलीत गरबा खेळणं हे एक तणावमुक्तीचं साधन बनलं आहे. नृत्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतं, तर त्याच वेळी नृत्य करताना होणारी मानसिक प्रसन्नता, आनंद, आणि उत्साह मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो.
हल्लीच्या काळात गरबा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून सांस्कृतिक, सामाजिक, मानसिक, आणि शारीरिक महत्त्वाचा सण बनला आहे. तो नुसताच एक नृत्यप्रकार नसून, समाजात नवीन ऊर्जा, एकता, आणि आनंद निर्माण करणारा सण आहे.
मस्त
उत्तर द्याहटवा