मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०२४

नाईट आउटची कोजागिरी:




“आजी, मला आणि माझ्या मित्रांना नाईट आउट करायचं आहे.  प्लीज , बाबांची परमिशन काढून दे ना ..”

आजी हसत बोलली  'नाईट आउट?  हे नक्की काय असतं? मला थोडं समजावून सांग बरं' .


' म्हणजे, आजी, आम्ही रात्री उशिरापर्यंत जागं राहायचं ठरवलं आहे. मग बाहेर गाडी घेऊन कुठेतरी जायचं, मग एखाद्या कॅफेमध्ये बसून खाणं-पिणं करायचं किंवा  चित्रपट बघायचा, आणि मग उशिरा घरी येणार. मज्जा असते एकदम!' 


आजी थोडं आश्चर्यचकित होत बोलली ,' अरे बाप रे, म्हणजे सगळी रात्र बाहेरच! पण का रे? दिवसा सगळं करता येतं ना?' 


अर्णव हसत  बोलला , ' हो, पण आजी, रात्रीचं वेगळंच असतं ना. तो शांत माहौल, रात्रीचा थंडावा, आणि त्या वेळी लोक कमी असतात, त्यामुळे आम्ही मस्त गप्पा मारू शकतो, कुठे गर्दी नसते. आणि दिवसा सगळे कामात व्यस्त असतात, त्यामुळे रात्रीच मोकळं वेळ मिळतो. छान  थ्रिल असतं .. तुला नाही कळणार किती मज्जा असते . तू  प्लीज माझं काम कर ना .. '


' असं रात्री -आपरात्री फिरणं मनाला पटत नाही बाळ..  '

अर्णव समजावत ' आजी, पण आम्ही रोज नाही करत. कधीतरी असं मित्रांसोबत वेळ घालवणं मजेशीर असतं. प्रत्येकाला वेळ मिळतो, आणि सगळी कामं संपल्यावर निवांत वेळ असतो. एक वेगळाच अनुभव असतो, तसा तुझ्या लहानपणी काही असायचं का?


आजी थोडं हसत बोलली  '  अरे, आमच्या लहानपणी असं नाईट आउट नव्हतं. पण आम्ही कधी-कधी चांदण्यांच्या प्रकाशात अंगणात बसून गप्पा मारायचो, किंवा दिवाळी, कोजागिरी अशा सणांच्या वेळेला रात्री जागं राहायचो. त्या वेळी दिवसभराचे सारे कष्ट विसरून फक्त एकमेकांसोबत हसायचं, बोलायचं, आणि गोड पदार्थ खायचे.' 

' आजी, कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय ..?' 

"कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्राच्या तेजस्वी प्रकाशात न्हालेलं एक पवित्र आणि आनंदमयी रात्र, जी मित्र आणि कुटुंबीयांसोबत साजरी केली जाते."


अर्णव खुश होऊन बोलला  'अगं, अगदी तसंच आहे! आम्हीही तेच करणार आहोत . दिवसाचा सगळा ताण विसरून एकमेकांसोबत मस्त वेळ घालवनार . तू म्हणतेस तसं, नात्यांमध्ये जवळीक आणण्यासाठीच ना?' 

" बाळा  पण हे आम्ही कधीही करत नाही . त्या दिवसाचे विशिष्ट महत्व असते . 

कोजागिरी साजरी करण्यामागे धार्मिक तसेच शास्त्रीय कारणं देखील आहेत. धार्मिक दृष्टिकोनातून, लक्ष्मीपूजन आणि चंद्रपूजेसाठी कोजागिरीचा दिवस महत्त्वाचा आहे, पण यामागे काही शास्त्रीय कारणेही आहेत.


कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण तेजाने चमकतो. आयुर्वेदानुसार, या पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये आरोग्यवर्धक गुण असतात. या किरणांमुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि मनाला शांती मिळते. त्यामुळे अनेक लोक चंद्रप्रकाशात दूध ठेवतात आणि नंतर ते सेवन करतात. असे मानले जाते की चंद्राच्या प्रकाशात ठेवलेल्या दूधात औषधी गुण येतात.


कोजागिरीच्या रात्री गोड दूध सेवन करण्याची परंपरा आहे. शरद ऋतूच्या सुरुवातीला तापमानात बदल होत असतो, ज्यामुळे शरीरातील वात आणि पित्त दोष वाढतात. गोड आणि गरम दूध शरीराला वात आणि पित्त दोष संतुलित करण्यासाठी उपयुक्त ठरते. दूधात केशर, साखर, वेलची, बदाम घालून ते अधिक पौष्टिक बनवलं जातं, जे पचनसंस्था सुधारते आणि शरीराला आवश्यक ऊर्जा मिळवून देते.

शरद ऋतूतील पौर्णिमा म्हणजे हिवाळ्याच्या आधीचा काळ, जिथे शरीरातील उष्णता वाढू शकते. कोजागिरीच्या रात्री शरीराला शांत ठेवणे आणि चंद्राच्या किरणांतून उष्णता कमी करण्याचा उद्देश असल्यामुळे या सणाचं शास्त्रीय महत्त्व आहे. त्यामुळे त्या दिवशी उघड्या आकाशाखाली चंद्रप्रकाशात दूध पिण्याची परंपरा आहे.


चंद्राचा प्रकाश मानसिक शांती देतो आणि तणाव कमी करण्यास मदत करतो, असं प्राचीन शास्त्रांमध्ये सांगितलं जातं. कोजागिरीच्या रात्री चंद्राकडे पाहून ध्यान करण्याची परंपरा आहे, ज्यामुळे मन शांत होतं आणि विचार स्वच्छ होतात. या दिवसाचा उद्देश म्हणजे मन आणि शरीराला ताजेतवाने करणे."

" आजी , एका  नाइट आऊट चे एवढे फायदे ..!" 

" हो , तर.. आम्ही वर्षभर या दिवसाची वाट पाहत असायचो . तुम्ही मुलं असं काहीच करत नाहीत  " बाबा   खोलीत येत बोलले . 

" पण कोजागिरी आहे कधी ..?"

" उद्याच आहे.."

" बाबा , मी उदया माझ्या मित्रांसोबत नाइट आउट .. सॉरी .. कोजागिरी साजरी करू शकतो का ..?"

" का नाही .. नक्कीच कर .. तुझ्या मित्राना त्याचे महत्व समजाऊन सांग .."

"हो , नक्कीच .. " 


अर्णव आजीच्या  कानात  बोलला " थॅंक यू , आजी! तू एकदम कूल आहेस!"

अर्णवने  आपल्या मित्राना  एका खास ठिकाणी घेऊन जाण्याचं ठरवलं—एक लहान टेकडीवरचे  गाव, जिथं अजूनही लोक जुनी परंपरा पाळत होते. त्यांनी ठरवलं की ते एका रात्रीला त्या ठिकाणी जाऊन कोजागिरी साजरी करतील.


"नाईट आउटची कोजागिरी"


त्या रात्री, मित्र मंडळींनी गावात पोहोचताच एका मोठ्या अंगणात चांदण्यांनी उजळलेलं वातावरण पाहिलं. गावातल्या लोकांनी मोठ्या आनंदात दुधाचा कढ आणि फराळाची तयारी केली होती. चांदण्यांच्या तेजात न्हाललेल्या त्या रात्रीत गावातल्यांनी त्यांना विचारलं, “को जागर्ति?” म्हणजे “कौन जाग रहा है?”


अर्णवने  हसत सांगितलं, “आम्ही जागतोय! आम्ही या शांत रात्रीत कोजागिरीच्या आनंदात न्हालायला आलोय.” गावकऱ्यांनी त्यांना कोजागिरीची परंपरा सांगितली—ही रात्र लक्ष्मीदेवीला प्रसन्न करण्याची, आपल्या कष्टांमधून विश्रांती घेण्याची आणि आपल्यातल्या नात्यांमध्ये पुन्हा एकदा जवळीक आणण्याची असते.


मित्रांनी त्या रात्री दुध पिऊन आणि गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांना कळलं की, या नाईट आउटमागचं खरं सुख फक्त मौजमजेत नाही, तर एकमेकांच्या सोबत असण्यात आहे. कोजागिरीसारख्या सणांनी त्यांना हे शिकवलं की कामाच्या व्यापात हरवलेल्या नात्यांना पुन्हा नव्याने उजळवण्याची ही एक संधी आहे.

जुन्या परंपरा सांभाळायच्या असतील तर त्यांना नवीन पिढी सोबत घेऊन असे खास दिवस  नवीन पिढी सोबत  त्यांच्या  कलेने घेऊन नवीन पिढीसह  साजरे केलेच  पाहिजेत 

 

३ टिप्पण्या:

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template