“ताई तू वेडी आहेस का .. अगं वाढदिवसाचे किती फोटो ठेवतेस स्टेटसला .... आपल्या फॅमिली मेंबर किंवा अगदी जवळच्या मैत्रिणीचा वाढदिवस असेल तर त्यांचे फोटो ठेवतेस इतपत ठीक आहे पण तू तर हद्दच करतेस…आत्याच्या सूनेचा फोटो , मावशीच्या जावेच्या मुलीचा फोटो , शाळेतल्या कधिकाळच्या मैत्रिणीचा फोटो … लोकं हसतात , नको ठेवत जाऊस इतके फोटो ” आदिती आपल्या मोठ्या बहिणीची चेष्टा करत हसतच बोलत होती .
“ मला आवडतं म्हणून मी ठेवते , लोकं हसतात तर हसू देत ...तुला काय करायाचं आहे .. ज्यांचा बर्थडे असतो त्या जाम खूश असतात. त्यांचा आनंद माझ्यासाठी महत्वाचा आहे . तुझ्यासारखे स्वत:चे फोटो ठेवायचे व गाणी वाजवायची ते मला आवडत नाही .”
दोघी बहिणींचे असेच नेहमी वाद होत असत.
आरोही नाती जपणारी गोड मुलगी होती . छोट्या - छोट्या गोष्टीतून लोकाना आनंद द्यायला तिला खूप आवडत असे . वाढदिवसादिनी स्टेटसला फोटो ठेवायला तिला खूप आवडत असे . रोजचे किमान चार - पाच बर्थ डे फोटो तर असायचेच .
आरोही म्हणायची ,"आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची आणि विश्वासू नाती असतात. अशा नात्यांना साजरे करण्याचे विविध मार्ग असतात, त्यातील एक साधा पण भावनिक मार्ग म्हणजे आपल्या माणसांचे वाढदिवस स्टेटसवर साजरा करणे. व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो स्टेटसवर ठेवण्याचे अनेक सकारात्मक मानसिक परिणाम होतात. ही कृती नात्यांना फुलवते आणि प्रेम वृद्धिंगत करते.
वाढदिवस हा प्रत्येका साठी विशेष दिवस असतो. स्वतःचे लाड करून घ्यायला सर्वाना आवडतात. आपला वाढदिवस आठवण ठेवून कोणीतरी विश करतो , या खास दिवशी आपले फोटो ,व्हिडिओ इतरांच्या स्टेटस वरती पाहिले की , वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचा दिवस अगदी आनंदात जातो . "
आपण बरेच वेळा आपल्या मैत्रिणीचे फोटो स्टेटसवर ठेवतो ही केवळ एक साधी कृती नसून, यात एक मोठा भावनिक अर्थ दडलेला असतो. आपण आपल्या मैत्रिणीचे महत्त्व लक्षात घेऊन तिचा सन्मान करत आहोत, हे तिला आपण दाखवतो. ही कृती मैत्रीत आपुलकी आणि विश्वास वाढवते. जेव्हा आपण कोणालाही महत्त्व देतो, तेव्हा त्या नात्यात जास्त जवळीक निर्माण होते आणि भावनिक आधार वाढतो.
नेहा ही आश्रमात वाढलेली अबोल व एकलकोंडी मुलगी पण तिच्या वाढदिवसाला सर्वानी स्टेटसला तिचे फोटो ठेवलेले पाहून तिला खूप भरून आले . तिच्या मनात आपुलकी निर्माण झाली . आपली काळजी करणारं , आपल्यावर प्रेम करणारं कोणीतरी आहे हे पाहून ती सुखाऊन गेली .
विमलने तिच्याकडे काम करणाऱ्या मावशीच्या वाढदिवसाला त्यांचा फोटो स्टेटसला ठेवला तेंव्हा सर्वानी तिला नावं ठेवली पण मावशी त्या दिवशी प्रचंड खुश होत्या , उभ्या आयुष्यात त्यांचा असा वाढदिवस कधी साजरा झाला नव्हता .
काही गैरसमजामुळे सीमाच्या सुनेच्या मनात सीमा बद्दल अढी निर्माण झाली होती पण
सीमाने आपल्या सुनेच्या वाढदिवसादिनी तिचा फोटो स्टेटसला ठेवून तिच्या मनात नव्याने जागा निर्माण केली होती .
आपल्या जवळच्या व्यक्तीचे महत्त्व दाखवणे यामध्ये खूप आनंद आणि समाधान मिळते. आपण ज्या व्यक्तीला आपलं मानतो, तिच्या विशेष दिवसाला आपण जास्त खास बनवतो, आणि त्यातून दोघांच्या नात्यात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. केलेली छोटीशी गोष्ट देखील मानसिक समाधान देणारी असते.
प्रेम ही भावना केवळ शब्दांत व्यक्त होण्यापेक्षा कृतीतून अधिक प्रभावीपणे व्यक्त होते. वाढदिवसानिमित्त फोटो स्टेटसवर ठेवणे ही प्रेमाची एक सुंदर अभिव्यक्ती आहे. यामुळे नात्यात स्नेह आणि कृतज्ञता व्यक्त होते. या कृतीमुळे ती व्यक्ति आपल्याला किती महत्त्वाची आहे हे तिला समजते, आणि यामुळे नात्यातील प्रेम अधिक बहरतं.
दीप्ती व नेहा या दोन खास मैत्रिणीमध्ये मागच्या दोन वर्षापासून अबोला निर्माण झाला होता पण दीप्तीच्या वाढदिवसाची आठवण फेसबूक ने करून दिली व चुकून नेहाने तो फोटो शेअर केला पण या कृतीमुळे दोघी मधील अबोला संपुष्टात आला .
मस्त
उत्तर द्याहटवाखूप छान.अप्रतिम.
उत्तर द्याहटवा