दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्सव, आणि चविष्ट फराळाचा काळ. लाडू, चकली, करंजी, शंकरपाळी, अनरसे—हे सगळे पदार्थ दिवाळीच्या फराळाचे अविभाज्य भाग आहेत. पण या गोड आणि खमंग पदार्थांबरोबरच अनेक घरात एक वेगळंच वातावरण असतं—मुलांच्या परीक्षा! दिवाळीच्या सुट्ट्या तशा खूप कमी असतात आणि त्या काळातच परीक्षा जवळ येत असतात, त्यामुळे मुलांच्या अभ्यासाचं आणि उत्सवाचं संतुलन राखणं हे पालकांसमोरचं मोठं आव्हान असतं.
सुवर्णाने हे संतुलन कसे केले ते पाहू..
" काय मग कुठपर्यंत आला फराळ..?"
नवीन लग्न झालेल्या आपल्या मुलीला रीताला सुवर्णाने प्रश्न विचारला." हे बघ , एका वाक्यात उत्तरे झाली, गाळलेल्या जागा झाल्या आता मोठी सविस्तर प्रश्न व टीपा लिहा बाकी आहेत." या मुलीच्या उत्तरावर दोघीही खळखळून हसल्या.
मुलीच्या या उत्तराने सुवर्णाला फराळ म्हणजे परीक्षा हे समीकरण आठवलं.
दोन्ही मुलांची सहामाही परीक्षा व दिवाळीचा फराळ दोन्ही एकदाच येत असतं. दोन्ही गोष्टींचा मेळ घालत दोन्हींचा समतोल घालत केलेला फराळ आठवला.
मुलांना परीक्षेची पूर्वतयारी करायला बसवली की, सामानाची यादी तयार होत असे. घरात काय सामान आहे, काय आणावे लागणार आहे याचे मनातल्या मनात चिंतन चालत असे
मुलगा मध्येच विचारायचा आई कुठलं उत्तर आठवतेस डोळे बंद करून..?
"अरे, मी मनाने स्वयंपाक घरात असलेल्या डब्यात डोकावून येते . किती साखर शिल्लक आहे. तुम्ही जसं नेमका कोणता प्रश्न कोणत्या पानावर आहे ते डोळे बंद करून सांगता अगदी तसं."
सुवर्णाच्या या बोलण्यावरून दोन्ही मुलं प्रश्न उत्तर शोधून काढून एकमेकांना विचारायचा खेळ खेळायची.
दिवाळीच्या सामानाची यादी व परीक्षेची तयारी न विसरता केली तर आयत्या वेळी काहीच घाई होत नाही. असं मुलाना दाखले देऊन सांगताना सुवर्णा रंगून जायची तर मुलं तल्लीन होऊन ऐकायची.
परीक्षेचं वेळापत्रक आलं की, कुठल्या विषयाचा अभ्यास कधी करायचा याच्या नियोजनावर दिवाळीच्या फराळाचे नियोजन अवलंबून असे.
दुसऱ्या दिवशी अवघड पेपर असेल तर आदल्या दिवशी सुवर्णा शंकर पाळे, पुऱ्या असा साधा फराळ बनवे तर ज्या दिवशी सोपा पेपर असेल मुलांना आईची मदत लागत नसेल त्या दिवशी मात्र लाडू , शेव असा बेत असे.
करंजी व चकली मात्र परीक्षा संपल्यानंतरच केली जात असे.
या दोन्ही पदार्थाला मोठ्या व सविस्तर प्रश्नाचा दर्जा देण्यात आला होता.
परीक्षेत अगोदर एका वाक्यात उत्तरे झाली की गाळलेल्या जागा मग कारणे द्या व सगळ्यात शेवटी टीपा लिहा व सविस्तर उत्तर लिहायची असतात . सुवर्णाचे दिवाळीच्या फराळाचे नियोजन असेच होते. छोटे छोटे व कमी वेळात होणारे पदार्थ तयार झाले की, मनावरती कामाचा ताण कमी होतो म्हणून चिवडा, पुऱ्या , शंकरपाळी,शेव, लाडू, अनारसे हे पदार्थ मुलांची परीक्षा चालू असताना करून घ्यायची . मुलांची परीक्षा झाली की, चकली व करंजीचा घाट घातला जात असे. लहानपणापासून मुलांना फराळ बनवताना मदतीला घेऊन आनंदाने पदार्थ बनवला जात असे. फराळ चाखायच्या अगोदर देवाला नवैद्य दाखवला जात असे.
दोन्ही मुलं आता मोठी झाली मुलगा परदेशात शिकायला गेला तर मुलगी लग्न होऊन सासरी गेली.
मुलांच्या परीक्षेचं कारण सांगून आईने कधीच बाजारातून फराळ आणला नाही उलट अभ्यास,परीक्षा याचं दिवाळीच्या फराळा सोबत समीकरण मांडून हसत खेळत केलेला फराळ मुलांना आजही आठवतो याचा सुवर्णाला खूप अभिमान वाटला.
दिवाळीचा फराळ आणि मुलांच्या परीक्षांचा तणाव या दोन्ही गोष्टींमध्ये योग्य संतुलन राखणं महत्त्वाचं आहे. पालकांनी मुलांना सणाचं महत्त्व आणि त्याबरोबरच त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगाव्यात. काही ठराविक नियम आणि योग्य नियोजन केल्यास दिवाळीचा फराळ आणि मुलांच्या परीक्षांचा अभ्यास या दोन्ही गोष्टी एकत्र साजऱ्या होऊ शकतात.
👌
उत्तर द्याहटवा