डॉ. प्रकाश आमटे यांचे प्रकाशवाटा हे पुस्तक वाचल्यानंतर त्याचा अभिप्राय मी लिहिला त्यावेळी माझ्या मैत्रिणीने मला काही वाचनीय पुस्तकांची नावे सुचवली . त्यात "समिधा " हे एक पुस्तक होते .
हे पुस्तक माझ्या हाती योगायोगाने लागले की , माझ्या मनातली जिज्ञासा पूर्ण करण्याचा नियतीचा हेतू होता ते माहीत नाही . आपण जो विचार करतो ते आपल्यासमोर उभं राहतं हे मात्र इतकंच खरं आहे याची प्रचिती आली .
प्रकाशवाटा वाचताना डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनातील संघर्ष, त्याग, आणि निस्वार्थ सेवाभावाने भारावून गेले . डॉ. प्रकाश आमटे यांनी केलेले कार्य म्हणजे खरेच “प्रकाशाच्या वाटा” उघडणारे आहे, ज्यातून सामान्य माणसाला प्रेरणा मिळते.
या पुस्तकाच्या अनुभवाने माझ्या मनात एका प्रश्नाची जिज्ञासा निर्माण झाली, त्यांची आई साधना आमटे यांची भूमिका कशी असेल? त्यांच्या विचारांची दिशाही अशीच सेवा, त्याग आणि प्रेमाची असेल का? मग समिधा हे साधना आमटे यांचे पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढली.
समिधा म्हणजे यज्ञासाठी वापरल्या जाणाऱ्या लहान लाकडाच्या काड्या किंवा तुकडे. हे लाकूड विशिष्ट प्रकारचे असते, जसे की पवित्र झाडाचे लाकूड, उदा. पिंपळ, बाभूळ, वड, पळस, यांचा वापर समिधा म्हणून केला जातो. यज्ञात आहुती देण्यासाठी या समिधांचा वापर केला जातो, ज्यामुळे वातावरण शुद्ध राहते असे मानले जाते.
साधना ताईच्या कार्याची उपमा समिधा ला देण्यात आली आहे हे पूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर प्रचिती आली .
समिधा हे साधना आमटे म्हणजे बाबा आमटे यांची भार्या व प्रकाश आमटे यांची आई यांचे आत्मचरित्र असून, त्यांनी आपल्या जीवनातील अनेक संघर्ष, सेवा, आणि साधनेचा प्रेरणादायी प्रवास यात मांडला आहे.
पुस्तकाची सुरुवात त्यांच्या लग्नाच्या अगोदरच्या काळापासून झाली . लग्नच करणार नाही असा बाबांचा निर्धार होता पण साधना ताई ना पाहताच ते प्रेमात पडले व त्यांचा रीतसर विवाह झाला . बाबांचे व साधना ताईचे एकमेकांवर जिवापाड प्रेम होतं हे पुस्तकात विविध प्रसंगातून दिसून येते .
आनंदवनात बाबांसोबत केलेले कार्य आणि त्यांच्या सोबत दिलेला संघर्षपूर्ण काळ, हा पुस्तकाचा एक हृदयस्पर्शी भाग आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, संसाधनांच्या अभावात आणि कठोर कष्टात आदिवासी आणि कुष्ठरोगी लोकांसाठी कार्य करणे हा त्यांचा एक अनोखा समर्पणभाव होता.
बाबांच्या कार्यात त्यांची कुटुंब म्हणून भूमिका निभावताना साधना आमटे यांना आलेले अनुभव, त्यांनी त्यांची साथ देताना त्यांचा अनुभवलेला संघर्ष आणि बाबांप्रती असलेला त्यांचा आदर, हे प्रसंग हृदयस्पर्शी आहेत.
समिधा मधील काही प्रसंग केवळ साधना आमटे यांचा संघर्षच दर्शवतात असे नाही, तर त्यातून त्यांच्या आत्म्याची शुद्धता, निःस्वार्थ प्रेम, आणि समाजसेवेसाठीची निस्सीम निष्ठा अनुभवता येते. हे प्रसंग वाचून माणुसकीच्या, सेवाभावाच्या मार्गावर चालण्याची आणि स्वतःला सत्कार्यात समर्पित करण्याची प्रेरणा मिळते.
साधना आमटे यांनी डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर अगदी शांत, परंतु महत्त्वपूर्ण संस्कार केले. आपल्या कार्यातून, समर्पणातून, आणि आदर्श जीवनशैलीतून त्यांनी प्रकाश आमटे यांना नुसतेच विचारांमध्ये घडवले नाही, तर एक ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून उभे केले. त्यांच्या अप्रत्यक्ष संस्कारांची अनेक रूपे पाहायला मिळतात. :
समिधा वाचताना मला साधनाताईच्या धैर्याचे, सहनशीलतेचे आणि दृढ निश्चयाचे दर्शन झाले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य बाबा आमटे यांच्या सोबत कुष्टरोग्यासोबत घालवले. प्रत्येक संघर्षात त्या एक शक्ती म्हणून उभ्या राहिल्या. साधना आमटे म्हणजे एक अशी ‘समिधा’, जी आपल्या साधनेतून निरंतर समाजकाऱ्यासाठी प्रज्वलित झाली आहे.
प्रकाश आमटे यांच्या प्रकाशवाटा ने मला जीवनात एक उद्दिष्ट दिले, आणि समिधा ने त्या उद्दिष्टासाठी समर्पित होण्याची प्रेरणा दिली. अशा महान व्यक्तिमत्त्वांचा जीवनप्रवास वाचताना त्यांच्या विचारांचा प्रकाश आमच्या जीवनातही समृद्ध होतो.
खूप छान
उत्तर द्याहटवाअगदी तंतोतंत खरं आहे.
उत्तर द्याहटवा👌👍🙏
धन्यवाद
हटवाधन्यवाद
हटवाप्रेरणदायी, आदर्श , समर्पणा चे मूर्तरूप समिधा..🙏
हटवाखूप छान
उत्तर द्याहटवा