या वर्षीच्या कार्तिक स्नानाची कालच समाप्ती झाली . कार्तिक स्नानाचे मला खूप चांगले अनुभव आले ते मला तुम्हाला सांगावे असे वाटतात . .
कार्तिक स्नान करायचे असते हे मला अचानक आठवले याचे कारण असे होत की , मला लवकर उठून , स्नान करून नित्याची कामे लवकर आटोपली जावी असे नेहमीच वाटायचे . हा माझा संकल्प जेमतेम चार ते पाच दिवस चालायचा पण नेहमी प्रमाणे येरे माझ्या मागल्या अशी अवस्था असायची . ही माझी सवय मला माहीत होती पण मला ही सवय बंद करायची होती. आपल्या सवयी बदलायच्या असतील तर त्याला धर्मिकतेची जोड दिली तर त्या बदलतात हे कुठेतरी वाचलं होतं . देवाला घाबरून आपण एखादा नियम न चुकता करतो हे पटलं होतं म्हणून कार्तिक स्नान करण्याचे ठरवले .
गावाला माझ्या काकू भल्या पहाटे उठून स्नान करायच्या व मंदिरात जायचे हे मला आठवले म्हणून त्यांना फोन केला . काकू नि मला सांगितले की ,कार्तिक स्नान म्हणजे सूर्योदयापूर्वी आंघोळ करायची , घरी देवाची पूजा करायची व मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्यायचे असा नियम ठेवायचा असतो .
काकूनी सांगितल्या प्रमाणे मी हा नियम चालू केला . सकाळी लवकर उठून, घरातील देवाची पूजा करणे व नियमित मंदिरात जाऊन येणे चालू होते . मी रोज लवकर मंदिरात येते , दर्शन घेते हे मंदिरातल्या गुरुजींच्या लक्षात आले त्यांनी मला याबद्दल विचारले . मी त्यांना माझ्या कार्तिक स्नानाच्या नियमा बद्दल सांगितलं . गुरुजी साधारण ऐंशी वर्षाचे होते . कार्तिक महिना म्हणजे सकाळी गुलाबी थंडी असते . गुरुजी धोतर व पाठीवर पंचा घेऊन प्रसाद देत बसलेले असत . थंडीत कुडकुडताना मी त्यांना बघत होती . गुरुजी साठी काय करता येईल असा विचार करू लागले होते तेंव्हा त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आले की , गुरुजी साडे चार वाजता घर सोडतात . एवढ्या लवकर चहा न पिता ते मंदिरात येतात . दुसऱ्या दिवशी पासून मी गुरुजी साठी चहा घेऊन जात होते . मी त्यांना चहा द्यायची व ते मनापासून मला आशीर्वाद द्यायचे . माझी व गुरुजींची छान मैत्री झाली होती . याच दरम्यान गुरुजींचा वाढदिवस आला होता . मी त्यांना मिठाई देऊन त्यांना शुभेच्या दिल्या . माझे ऐंशी वर्ष पूर्ण झाले हे सांगताना मला त्यांच्या नजरेत समाधान व अभिमान दिसला . गुरुजी नि मला दिवाळीचा फराळ दिला . आमच्यामध्ये आजोबा नातीचा स्नेह निर्माण झाला होता . कधी एक महिना पूर्ण झाला ते कळलंच नाही . ते माझं कार्तिक स्नान करण्याचे पहिलेच वर्ष होते . मनोभावे या नियमचे पालन केले खूप समाधान वाटले महत्वाचे म्हणजे मी संकल्प पूर्ण करू शकते असा आत्मविश्वास निर्माण झाला .
या वर्षी कार्तिक स्नानाचा नियम चालू ठेवला पण मुलाची शाळा व डबा यामुळे मंदिरात गेले नाही . या वर्षी गुरुजी हयात नव्हते , गुरुजीना देवाज्ञा झाली होती . मंदिरात जाणे जमले नाही म्हणजे खरे तर गुरुजींची कमी भासेल म्हणून मंदिरात जाणे टाळले .
या वर्षी पहाटेच्या वेळी उठणं कठीण वाटत होतं, पण कार्तिक महिन्याचं महत्त्व आठवलं आणि एक प्रकारची उर्जा मिळाली. पहिले चार दिवस गजराची आवश्यकता भासली त्यानंतर मात्र एका अनामिक ओढीने जाग येत होती . कार्तिक महिन्याची सुरुवात झाली की वातावरणात एक वेगळाच उत्साह असतो. सकाळी लवकर उठून स्नान करायचं, देवाची पूजा करायची , पहाटे आरती सोबत घंटेचा आवाज घराला नवचैतन्य देऊन जातो .
कार्तिक स्नानाची समाप्ती म्हणजे त्रिपुरी ( कार्तिक ) पौर्णिमा . माझा हा कार्तिक स्नानाचा नियम आमच्या काळे काकू ना माहीत होता त्यांनी मला सांगितले की , तू पौर्णिमे दिवशी त्रिपुरारी वात लावत जा , फक्त त्यांनी मला हे नुसतेच सांगितले नाही तर त्या स्वतः मागच्या चार वर्षापासून मला या वाती बनवून देतात . स्वतः हाताने बनवलेल्या वाती स्वतः च्या घरी स्वतःच्या हाताने न लावत त्या मला देतात . एवढे प्रेम करणारी माणसे मिळायला नशीब लागतं हे मात्र इतकंच खरं आहे .
मानवाच्या जीवनात धार्मिक नियम आणि परंपरा केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी नव्हे, तर त्याच्या जीवनशैलीत शिस्त, सकारात्मकता, आणि आरोग्यपूर्ण सवयी रुजवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. जर धार्मिक नियम आपल्या दैनंदिन सवयींशी जोडले, तर त्याचा शारीरिक, मानसिक, आणि सामाजिक जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो.
धार्मिक नियम आणि दैनंदिन सवयी यांची सांगड घातल्याने जीवनशैली अधिक शिस्तबद्ध, आरोग्यदायी, आणि समाधानी होते. त्यामागे शास्त्रीय कारणे आणि भावनिक स्वास्थ्य यांचा सुरेख संगम आहे. अशा प्रकारे परंपरांचा आधार घेऊन आपण आधुनिक जगातही संतुलित जीवन जगू शकतो.
धार्मिक परंपरांमधील शाश्वत तत्त्वांना नव्या दृष्टिकोनातून समजून घेऊन त्यांचा आपल्या सवयींमध्ये उपयोग केला, तर त्याचा दीर्घकालीन लाभ निश्चितच मिळेल.
कार्तिक स्नानानंतर असं वाटलं की हे फक्त शरीराचं शुद्धीकरण नाही, तर मनही शुद्ध झालं आहे. या अनुभवातून कळलं की आपल्या परंपरा किती महान आहेत . आपले पूर्वज किती हुशार होते असे नियम करून स्वयं शिस्त आपल्याला शिकवली आहे .कार्तिक स्नानाचा अनुभव मनाला केवळ शांतीच देत नाही, तर आपल्या दैनंदिन आयुष्यात नवी ऊर्जा, सकारात्मकता, आणि निसर्गाशी असलेलं नातं दृढ करतो. या परंपरेचा भाग होऊन मला माझ्या संस्कृतीचा अभिमान वाटतो.
यंदाच्या कार्तिक स्नानाचा अनुभव केवळ अध्यात्मिक नव्हे, तर एक प्रकारची उर्जा देणारा ठरला. आता पुढच्या वर्षी अजूनही अधिक श्रद्धेने आणि नियमितपणे हा अनुभव घ्यायचा संकल्प मी केला आहे. कार्तिक स्नान माझ्यासाठी केवळ परंपरा नसून आत्मशुद्धीचा मार्ग आहे, असं मी अनुभवलं.
खरचं काही गोष्टींना संकल्पाची जोड दिली तर किती छान सकारात्मक बदल घडून येतो ना स्वतःच्यात पण.
उत्तर द्याहटवा