घरी टीव्ही चालू होता म्हणून सहजच कलर्स मराठी वरील 'इंद्रायणी' ही मालिका पाहिली . सतत चार दिवस मालिका पाहिली आणि मी या मालिकेच्या प्रेमात पडले .
हल्लीच्या मराठी व हिन्दी मालिकेचा विषय निघाला की , लोक कानावर हात ठेवतात .बहुतेक मालिका कुटुंबातील संघर्षांवर आधारित असतात. सासू-सून वाद, भाऊ-भावंडांमधील ईर्षा, आणि संपत्तीवरून होणारे वाद हे सतत प्रेक्षकांना दाखवलं जातं. यामुळे घराघरांत नात्यांबद्दल संशय आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढते. मालिकेतील वादावादी , कटकटी कारस्थाने बघून प्रेक्षकाना कंटाळा आला आहे . प्रत्येक मालिकेत एक खलनायक किंवा खलनायिका असते . ते सतत कट कारस्थाने करतात , त्यांना माफ केले जाते परत काहीतरी नवीन कट चालू अशी शृंखला चालू असते .
वाढत्या नकारात्मक भावांचा प्रभाव चिंतेचा विषय बनला आहे .
इंद्रायणी या मालिकेत वेगळ काय आहे याचा विचार करू लागले . तसे पहिले तर खलनायिकेच्या भूमिकेत आनिता दाते हिने सुंदर भूमिका केली आहे . या मालिकेतील संदीप पाठक यांची भूमिका प्रेरणादायी आहे . ही मालिका आकर्षित करण्याचे मुख्य कारण म्हणजे या मालिकेतील बच्चे कंपनी . त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव जीवंत आहेत . त्यात कुठलाच नाटकीपणा नाही .
आपल्या अफलातून अभिनयाने चिमुकलीने प्रेक्षकांना वेड लावलं आहे ती म्हणजे मालिकेतील सालस इंदू. एक निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ आणि तितकीच विचारी मुलगी. वय लहान परंतु बुद्धी मात्र मोठ्यांनाही अचंबित करणारी!! इंदूच्या निरागस तरी मार्मिक प्रश्नांनी भल्याभल्यांना निरूत्तर करते आणि तितकंच तिचं अस्सल नि अवखळ बालपण अनेकांना आपल्या बालपणाची आठवणही करून देतंय. त्यामुळेच ही चिमुकली नेमकी आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. इंद्रायणी' या मालिकेत इंदूची भूमिका साकारतेय ती बालकलाकार सांची भोईर. सांची मूळची साताऱ्यातील कराड गावची आहे.
तिचा साधा पेहराव , तिचे चेहऱ्यावरचे हावभाव , संवाद फेक अफलातून आहे . या मालिके मध्ये विठ्ठलाचे मंदिर दाखवले आहे . विठ्ठलाची मूर्ती पाहून मन प्रसन्न होते . इंदु ज्यावेळी विठ्ठलाशी संवाद साधते त्यावेळी असे वाटते की , इतका निरागस प्रश्न ऐकून देव खरंच अवतरेल.
या आधुनिक काळात मुलांच्या सवयी त्यांची दिनचर्या वेगळी असते . हल्लीची मुले इंटरनेट च्या विश्वात हरवली आहेत पण या मालिकेतील मुलांचे खेळ , त्यांची विचार करण्याची पद्धत खूप आवडली .
मुलांचा निरागस स्वभाव यामध्ये जपला आहे . त्यांची लुटुपुटू ची भांडणे , एकत्र मिळून केलेली मस्ती . मित्राना संकटात केलेली मदत छान दाखवण्यात आली आहेत .
भजन व कीर्तन याला मुकलेली आजची पिढी या मालिकेमुळे परिचित होईल अशी आशा आहे .
सणवार , परीक्षेचा काळ याच्याशी मेळ घालून मुलाना किल्ले बांधण्याचे महत्व सांगितले गेले . मुलांच्या बारीक सारिक गोष्टींचा विचार करून मालिकेतील प्रसंग चित्रित केले आहेत .
व्यंकट महाराजांच्या भूमिकेत संदीप पाठक यांनी शांत वा समंजस्य भूमिका केली आहे . त्यांच्या भूमिकेची छाप प्रेक्षकावर नक्कीच पडली आहे .
मालिका प्रेक्षकांचे मनप्रबोधन करणारे एक महत्त्वाचे माध्यम आहे. त्यांचा उपयोग सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी व्हायला हवा. मनोरंजनाच्या नावाखाली नकारात्मक भाव पोसणे बंद होऊन प्रेरणादायी कथांना प्राधान्य दिल्यास समाज अधिक समृद्ध आणि सुसंस्कृत होईल.
इंद्रायणी मालिकेमध्ये खलनायिकेची कट कारस्थाने आहेत ते टीआरपी वाढवण्यासाठी करावे लागतात पण सकारात्मक भाग जास्त आहे . कलर्स मराठी वरती संध्याकाळी सात वाजता मालिका नक्की बघा मुलांच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव आपल्या लहानपणीची आठवण करून देतील
अगदी खरं आहे.आम्ही ती मालिका बघतो.
उत्तर द्याहटवामालिका बघायला पाहिजे
उत्तर द्याहटवा