अंजलीने आज नवऱ्याच्या आवडीचा ड्रेस घालून केसात गजरा माळला होता . हातात चहाचा कप घेतला व दुसऱ्या हातात गुलाबाचे फूल व सुंदर हस्तलिखित ग्रिटींग देत बोलली ," तुझ्यासारखा पार्टनर आहे म्हणून व म्हणूनच माझा स्त्री दिन रोज साजरा होतो , पण आज तुला तुझ्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्या "
" आज माझा वाढदिवस आहे का .. ?? नाही तर .. आपल्या लग्नाचा वाढदिवस .."
" नाही .. आज दोन्ही नाही घाबरू नको .. आज जागतिक पुरुष दिन आहे ."
" म्हणजे महिला दिनासारखा पुरूष दिन पण असतो ..?"
" हो , मलाही कालच कळले .. म्हटलं चला आज एका माणसाला स्पेशल ट्रीटमेंट देऊ .."
जागतिक पुरुष दिन असतो ही गोष्ट कोणाला माहीतच नसते . महिला दिनाचा उत्सव बऱ्याच ठिकाणी साजरा होतो पण पुरुष दिनाची वाच्यता कोठे होताना दिसत नाही . महिलावर झालेले अत्याचार लक्षात घेता समाजात स्त्री व पुरुष दोघा मध्ये समानता यावी म्हणून सर्वच क्षेत्रातून प्रयत्न होताना दिसतात .
आता चांगल्या पैकी महिलांची प्रगती झाली आहे पण आता काही बाबतीत असे निदर्शनास येते की , पुरुषा वरती अन्याय होतो . माझा मुलगा म्हणतो " आई , शाळेमध्ये प्रत्येक गोष्टीत मुलीना झुकते माप दिले जाते . मुलं म्हणून आम्ही सारखेच मागे असतो . स्त्री पुरुष समानता म्हणतात ना मग असे का ..?"
पुरुष हा अन्याय करणारा, स्त्री चे शोषण करनारा , स्त्रियांच्या प्रगतीच्या आड येनारा अशीच त्यांची व्याख्या होते .
सगळेच पुरुष वाईट नसतात पण गव्हा सोबत किडे रगडले जातात त्यामुळे सर्व पुरुषाना पुरुषदिना पासून वंचित रहावे लागते .
आपल्या आसपास असणाऱ्या पुरुषाचा दिवस आपण कसा साजरा करू शकतो याचा विचार करू ...
जागतिक पुरुष दिन साजरा करण्याचा विचार करून अंजलीने स्वतच्या हाताने आपल्या बाबाला व नवऱ्याला पत्र लिहिले व त्यात त्यांच्या विषयी भावना तर लिहल्याच शिवाय अश्या प्रसंगाची आठवण करून दिली की , ज्यावेळी त्यांचा खूप मोठा आधार तिला वाटला . अनुश्री ने आपल्या भावाचे प्रत्येक प्रसंगी बक्षीस घेतानाचे फोटो एकत्र केले व सोशल मीडिया वरती पोस्ट केले . स्मिता आपल्या बाबाना हेल्थ चेकअप करायला मोठ्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेली व तिथून बाबा सोबत चौपाटी फिरून आली . प्रतिभाने तिच्या मित्रासाठी एका योगा क्लास ची भेट घेतली व गिफ्ट म्हणून एका वर्षाची फीज भरून आली . नेहाने आपल्या पुरुष सहकाऱ्यासाठी सरप्राइज पार्टी अरेंज केली .
आपण यावर्षी पुरुष दिन साजरा करण्यासाठी आपण त्यांचा आवडीचा एक दिवस घालवू शकतो , जसे त्यांना त्यांचा आवडता खेळ खेळायला घेऊन जा, किंवा त्यांचे आवडते जेवण बनवा. त्यांच्या नावाने किंवा त्यांच्या सोबत एकत्र एखाद्या सामाजिक उपक्रमात भाग घ्या, जसे की वृद्धाश्रम भेट, रक्तदान किंवा पर्यावरण स्वच्छता उपक्रम.
त्यांना ऐकून घ्या आणि त्यांच्या अडचणी किंवा विचारांवर मोकळेपणाने संवाद साधा.त्यांना त्यांच्या भावनांना प्रकट करण्यासाठी आधार द्या.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास
1999 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील वेस्ट इंडीज विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. जेरोम तेलकसिंग यांनी त्यांच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन पहिल्यांदा साजरा केला. या दिवशी त्यांनी पुरुषांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रोत्साहन दिले. 19 नोव्हेंबर 2007 रोजी भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे महत्त्व
आंतरराष्ट्रीय पुरूष दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की, पुरूषांचे संघर्ष आणि ते वर्षानुवर्षे सामोरे जात असलेल्या सामाजिक परिस्थितीची माहिती समाजाला होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
पुरुषांच्या आरोग्याप्रति, लिंग संबंधाविषयी जागरुकता, लैंगिक समानतेचा विकास करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. पुरुषांचीही समाजात आणि कुटुंबात वेगळी ओळख असते. त्यांच्या योगदानाचे कौतुक करणे महत्त्वाचे आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो.
जागतिक पुरुषदिनाची यावर्षीची थीम
या वर्षी (2024) जागतिक पुरुष दिन (International Men’s Day) 19 नोव्हेंबर रोजी “Men’s Health Champions” या थीमखाली साजरा केला जात आहे. या थीमचा उद्देश पुरुषांच्या आरोग्यासंबंधित आव्हानांवर प्रकाश टाकणे आणि आरोग्यासाठी सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्तींचे योगदान साजरे करणे हा आहे.
पुरुष दिनाच्या उद्दिष्टांबद्दल जागरूकता वाढवणे गरजेचे आहे, विशेषतः मानसिक आरोग्य, पितृत्व, आणि समाजातील त्यांची सकारात्मक भूमिका याविषयी.माध्यमे आणि शैक्षणिक संस्था या विषयावर चर्चा घडवून आणू शकतात.महिलांप्रमाणेच पुरुषांसाठीही त्यांच्या आरोग्य, तणाव व्यवस्थापन, आणि सामाजिक अपेक्षांवर आधारित उपक्रम राबवले पाहिजेत.पुरुष दिनाला योग्य प्रतिसाद मिळण्यासाठी, या दिवसाचे उद्दिष्ट स्पष्टपणे लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे.
पुरुषांच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणाऱ्या पोस्ट्स शेअर करा. #MensHealthChampions आणि #InternationalMensDay वापरून सकारात्मक संदेश पसरवा.
प्रत्येक पुरुषाने स्वतःसाठी आरोग्यविषयक उद्दिष्ट ठरवावे, जसे की धूम्रपान सोडणे, आहार सुधारणे किंवा तणाव व्यवस्थापनासाठी उपाय करणे गरजेचे आहे .
खूप छान विचार आहे
उत्तर द्याहटवा