पूजा सकाळ पासून खूपच अपसेट होती . घरातल्या व ऑफिसच्या कटकटी मुळे ती त्रासूण गेली होती . कोणी तिला समजूनच घेत नव्हते . कोनासमोर मन मोकळं करावं म्हटलं तर अशी एकही व्यक्ति तिच्या जवळ नव्हती . प्रेमविवाह केल्यामुळे माहेरला पोरकी झाली होती . स्वतः च विचार करून झुरत चालली होती .
संध्याकाळी दारावरची बेल वाजली तशी पूजा भानावर आली . आता कोण आलं असेल असं विचार करत दरवाजा उघडला ,समोर शेजारची शुभदा उभी होती . मनात नसताना चेहऱ्यावर हास्य आणत तिचं स्वागत केलं .
" अगं .. संध्याकाळच्या वेळी सगळे लाइट बंद करून का बसली आहेस .. काही झालंय का ..?"
" काहीच नाही .. आता लाइट लावणारच होती एव्हडयात तू आली .. बोल ना काय म्हणतेस ?"
" सहजच आले ..खूप दिवसात आपली भेट नाही , बोलणं नाही म्हटलं काय करतेस बघू .."
दोघींच्या अवांतर गप्पा चालू होत्या पण शुभदाच्या लक्षात आले की , पूजा अपसेट आहे , पण ती काही सांगणार नाही हे माहीत होतं म्हणून शुभदा ने काहीच विचारलं नाही .
शुभदाची नजर गॅलरीतील बहरलेल्या तुळशीकडे गेली.
" अय्या ....तुझी तुळस किती छान आली आहे ग ..!"
" हो " असं म्हणत पूजा शुभदा साठी चहा करायला आत मध्ये गेली .
चहा पिताना शुभदा बोलली ," आज तुझी तुळस बघून मला माझ्या मैत्रिणीच्या सुमित्राच्या घरची तुळस आठवली .
सुमित्रा माझी लहानपणीची मैत्रीण आहे शांत स्वभावाची, संवेदनशील व हसतमुख चेहऱ्याची आहे . तिचं अंगण म्हणजे तिचं हृदय होतं, आणि त्या अंगणाच्या मध्यभागी उभी असलेली तुळस तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होती. ती तिच्या सुखदुःखाच्या गोष्टी तुळशीला सांगत असे, जणू तिची सखीसोबत संवाद साधत असे .
सुमित्राचं आयुष्य छोट्या छोट्या आनंदांनी भरलेलं होतं. जेव्हा ती पदवीची परीक्षा चांगल्या गुणानी पास झाली तेव्हा तिनं तुळशीसमोर दिवा लावून आनंद व्यक्त केला. त्यावेळी मी तिथेच होते ती म्हणाली ,
“तुळशीमाते, तुझ्या कृपेने मला यश मिळालं. हे आनंदाचे क्षण तुला अर्पण करते.”
तिच्या मनात हे ठाम होतं की, तुळशीचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही.
पण आयुष्य नेहमी आनंदानेच भरलेलं नसतं. एकदा तिच्या पतीच्या अचानक झालेल्या आजारपणामुळे ती खूप अस्वस्थ झाली होती. त्या वेळी तिनं तुळशीसमोर जाऊन रडत रडत प्रार्थना केली,
“हे तुळशीमाते, माझ्या संसाराचं रक्षण कर. माझ्या पतीला बरे होऊ दे. तुझ्या पायांशी बसून मी फक्त तुलाच सांगते; तुझ्यावरच विश्वास आहे.”
तुळशीच्या समोर बसून ती आपलं दु:ख मोकळं करत असे. तिला वाटे की तुळशी तिचं सांत्वन करत आहे. तिच्या मनातल्या वादळाला थोडं शांत करण्यासाठी तुळशी तिची साथीदार बनली आहे .
सुमित्रासाठी तुळशी ही केवळ एक झाड नव्हती. ती तिच्या श्रद्धेचा आधार होती.
" खरंच आपण असा संवाद साधू शकतो .."
" अगदीच .. आपण आपलं मन सहसा कोनासमोर मोकळे करत नाही . मनातल्या मनात कुढत बसतो पण आपण तुळशीसमोर बसून मनोमन संवाद साधला तर तो तिच्या पर्यंत पोहचतो वआपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला तुळस दाखवते .
मी कधी अस्वस्थ झाली तर तुळशी समोर बसून माझं मन मोकळं करते . मना ने मनासोबत साधलेला संवाद असतो .
तुळशीसारख्या अबोल घटकाशी संवाद साधणे म्हणजे आपले भावनिक ओझे हलके करण्याचा मार्ग असतो.
मानसशास्त्रात याला Cognitive Offloading म्हटले जाते, ज्यामुळे मनातील नकारात्मक भावना आणि ताण हलका होतो.
तुळशीशी संवाद साधताना व्यक्ती स्वतःच्या भावना पुन्हा अनुभवते आणि त्या नीट समजून घेते.
मानसशास्त्रीय अभ्यासांनुसार, आत्मचिंतन (Self-Reflection) हे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
जरी तुळशीशी संवाद हा एकतर्फी असतो, तरीही त्यातून व्यक्तीला “कोणी तरी आपल्याला ऐकत आहे” अशी जाणीव होते.
तुळशीशी बोलणं म्हणजे एका प्रकारचा थेरप्यूटिक अनुभव आहे. यातून ताण कमी होतो, आत्मविश्वास वाढतो, आणि व्यक्तीला निसर्गाशी तसेच स्वतःशी भावनिक नातं जोडण्याची संधी मिळते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment