“साक्षी, बघ, मी खास तुझ्यासाठी मेथ्याचे लाडू बनवले आहेत,” आजी प्रेमाने आपल्या नातीला सांगत होती.
“आजी, कितीदा सांगू? मला हे लाडू आवडत नाहीत. किती कडू असतात ते शिवाय त्यात किती तूप, साखर, आणि कॅलरीज असतील! मी डाएटवर आहे,” साक्षीने तोंड वाकडं करत उत्तर दिलं.
" पिझ्झा , बर्गर खाताना कुठे असतो ग तुझा डायट ..?"
साक्षी जीभ चावते व आजीला जवळ घेत बोलते " प्लीज आजी आग्रह करू नको ना .. हे खाल्ले तर मला डबल वर्कआउट करावे लागेल .."
“अगं, डाएटवर असलीस तरी हिवाळ्यात हे लाडू खूप उपयोगी असतात. ”
साक्षी ही आधुनिक विचारांची, २० वर्षांची तरुणी. इंग्रजी माध्यमात शिकलेली, फिटनेस फ्रिक, आणि हिवाळ्यात गाजर हलवा, मोदक, किंवा पिझ्झा खाण्यात अधिक रस असलेली. तिचा एकूणच पारंपरिक पदार्थांकडे बघण्याचा दृष्टिकोण फार काही चांगला नसतो .
आजीने सोफ्यावर बसत हळूवार सुरुवात केली.
“साक्षी, तुला माहीत आहे का, हिवाळ्यात शरीराला उष्णता हवी असते? थंडीमुळे सांधेदुखी, सर्दी, किंवा इतर त्रास होऊ शकतात. मेथ्याचे लाडू हे फक्त गोड पदार्थ नाहीत, तर त्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत.”
“पण आजी, मला सर्दी होत नाही, मी जिम करते, तिथे मला भरपूर व्यायाम होतो,” साक्षी म्हणाली.
“अगं, जिममुळे शरीर फिट राहील, पण शरीराला योग्य पोषण हवं. मेथ्या शरीराची उष्णता वाढवतात, सांध्यांच्या वेदना कमी करतात, आणि पचन सुधारतात. तुला माहीत आहे का, यामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे हिवाळ्यातील थकवा आणि त्वचेच्या कोरडेपणावर उपयोगी ठरतात?”
साक्षीला अजूनही रस वाटत नव्हता. ती म्हणाली, “पण आजी, त्यात तूप आणि साखर असते ना? त्याने वजन वाढतं. आमच्या कॉलेज मध्ये आता ब्युटी कोंटेस्ट आहे . तुझ्या या लाडू मूळे माझे वजन वाढेल ना ”
“बरोबर आहे, पण प्रमाण महत्त्वाचं आहे. दिवसातून एक लाडू खाल्लास, तर त्याने वजन वाढत नाही, उलट शरीराला ऊर्जा मिळते. तुला माहीत आहे का, पूर्वीच्या काळी आजी-आजोबांनी थंडीत मेथ्याचे लाडू खाऊनच खडतर हिवाळा काढला होता? त्यातलं तूप सांधेदुखीसाठी फायदेशीर आहे, आणि गूळ पचन सुधारतो.”
" आजी पण आपल्या कडे एवढी थंडी असतेच कुठे .. हिवाळ्यात पण आपले पंखे चालूच असतात ना .."
" मेथ्यां म्हणजे पोषणमूल्यांचा खजिना आहेत . मेथ्या औषधी वनस्पती असून त्यामध्ये अनेक पोषक घटक असतात त्यामध्ये प्रोटीन आणि फायबर असतात त्यामुळे पचन सुधारण्यासाठी ते फायदेशीर ठरतात त्यात असलेले लोह (Iron) रक्तात हिमोग्लोबिन वाढवते, ज्यामुळे थकवा जाणवत नाही.
त्यात असलेल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मूळे हाडांचे आरोग्य सुधारते.अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील सूज कमी करतात आणि थंडीमुळे होणारे सांधेदुखीचे त्रास कमी करतात."
" आजी , तू तर डायटेशीयन असल्यासारखी बोलत आहेस .. मेथ्यांमध्ये इतके गुणधर्म कसे असतात?”
" तुझ्या त्या ब्युटी कोंटेस्ट साठी पण याचा उपयोग होईल बरं का .."
"तो कसा ..?" साक्षीने उत्सुकतेने विचारले .
" मेथ्या ह्या त्वचेसाठी नैसर्गिक उपाय आहेत , ज्या शरीराला आतून सुधारतात आणि बाहेरून सुंदर बनवतात . त्वचेसाठी फक्त बाह्य उत्पादनांचा वापर पुरेसा नसतो; त्यामुळे शरीराच्या आतून पोषणासाठी आहारात मेथ्यांचा समावेश करावा . मेथ्यांमध्ये असलेले पोषक घटक त्वचेच्या प्रत्येक समस्येवर प्रभावी उपाय देतात. तुम्हाला चमकदार, स्वच्छ आणि सुंदर त्वचा हवी असल्यास आहारात मेथ्यांचा समावेश करावा लागतो "
साक्षीला आजीचे बोलणे पटू लागले होते .
आजीच्या संवादाने साक्षी प्रभावित झाली. तिने हसत विचारले, “आजी, मी एक लाडू खाल्ला तर चालेल ना?”
“हो, अगं, पण तुला तो लाडू आवडल्यावर आणखी खावंसं वाटेल,” आजी हसत म्हणाली.
साक्षीने एक लाडू खाल्ला. त्याची चव अप्रतिम होती. “आजी, खरंच खूप छान आहे. आता मला तुझी गोष्ट कळली. यापुढे थंडीत मी मेथ्याचे लाडू नक्की खाईन.”
त्या दिवसापासून साक्षीने आपल्या मैत्रिणींनाही मेथ्याचे महत्त्व सांगितले. ती म्हणायची, “फिटनेस आणि हेल्दी लाइफस्टाइलसाठी काही पारंपरिक पदार्थांनाही आपल्या आहारात स्थान दिलं पाहिजे. आमच्या आजी-आजोबांची पद्धत विज्ञानावर आधारितच होती!”
पारंपरिक पदार्थांकडे आजच्या पिढीचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. मेथ्याचे लाडू हे फक्त गोड पदार्थ नाहीत, तर एक औषधी खजिना आहेत. आधुनिक विचारसरणी असली तरी आपल्या परंपरेला मान देणे ही सुद्धा काळाची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment