मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४

प्रिय किरणदादा..




आपल्या जीवनात असे काही क्षण येतात की , आपल्या जवळच्या , प्रेमाच्या व्यक्ति आपल्याला कायमचे सोडून जातात . आपल्याला खूप दु:ख होते पण नियती पुढे कोणाचे काही चालत नाही . 

आपण त्या व्यक्तीच्या स्मरणात दरवर्षी त्यांचे श्राद्ध  करतो .   

श्राद्ध हा केवळ धार्मिक विधी नसून, आपल्या जिवलग व्यक्तीच्या आठवणींना उजाळा देण्याचा आणि त्यांच्या जीवनातील शिकवणींना पुन्हा एकदा अनुभवण्याचा दिवस असतो . श्राद्धाच्या दिवशी आपण  आपल्या दिवंगत प्रियजनांशी संवाद साधणारे पत्र लिहिले  किंवा त्यांच्या सोबत मनोमन संवाद साधला तर हे त्यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करण्याचा अत्यंत सुंदर मार्ग ठरू शकतो.

पत्र लिहिण्याचा उद्देश म्हणजे त्या व्यक्तीच्या आठवणींना उजाळा देणे, त्यांच्या आयुष्यातून आपल्याला काय शिकायला मिळाले, ते मांडणे, आणि आपले ऋण व्यक्त करणे. हे पत्र केवळ एक औपचारिकता म्हणून न लिहिता, आपल्या हृदयातील भावना मोकळेपणाने व्यक्त करणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने आपले मन मोकळे होऊ शकते . आपण त्यांच्याशी बोलू शकतो या भावनेने आपले मन प्रसन्न होईल . 


आपल्या प्रियजनांनी आयुष्यभर आपल्या जीवनाला समृद्ध करण्यासाठी अनेक गोष्टी दिलेल्या असतात—मूल्य, संस्कार, मार्गदर्शन, आणि प्रेम. त्यांच्या या शिकवणींचे आपल्या आयुष्यातील महत्त्व अधोरेखित करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करन्याचा हा उत्तम मार्ग आहे .


श्राद्धाच्या दिवशी प्रेमपूर्वक पत्र लिहिणे म्हणजे आपल्या दिवंगत व्यक्तीच्या स्मरणार्थ एक अनोखा आणि हृदयस्पर्शी संवाद साधणे आहे . हे पत्र केवळ आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत नाही, तर त्या व्यक्तीच्या शिकवणींना जपण्याचा आणि पुढे नेण्याचा वचनही ठरतो. असे पत्र लिहिणे ही एक सुंदर भावना आहे, जी त्यांच्या अस्तित्वाला आणि आपल्या आठवणींना अमर बनवते.

  

माझ्या भावाचे सतरा  वर्षा पूर्वी अपघाती निधन झाले . नियतीने खूप मोठा घाला आमच्या परिवारा वरती घातला  होता . आज त्याचे श्राद्ध आहे असेच आठवणी जागे करणारे पत्र मी लिहिले आहे . 

त्याच्या सोबतचा हा संवाद मला नवीन ऊर्जा देणारा  ठरला 



प्रिय किरणदादा,

आज तुला जाऊन सतरा वर्ष पूर्ण झाली .  तुझी आठवण येण्यासाठी  हा  दिवस येण्याची वाट बघते असे नाही . तू व  तुझे विचार नेहमीच आमच्या सोबत असतात पण  आज खास तुझ्यासोबत संवाद साधण्याचा , तुझ्या सोबत  बोलण्याचा  विचार करते , तुझ्याबरोबर घालवलेले क्षण कसे पुन्हा जगता येतील?

 सतरा  वर्षांचा काळ लोटला, पण तू दिलेली शिकवण, तुझं प्रेम, तुझ्या आठवणी आजही मनाला अगदी जिवंत ठेवतात. हे पत्र लिहिताना डोळ्यांत पाणी आहे, पण तुझ्या आठवणींनी मनात अभिमानही आहे. आज मला तुझ्या शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी तुला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. 


तू नेहमी सांगायचास, “शिक्षणाशिवाय काहीच नाही. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो , विचारी  होतो .” 

शाळेत असताना एकदा मला गणिताचा गृहपाठ सांगितला होता . मला ती गणितं  येत नव्हती. रात्र जागून काढली होती . 

शाळेत मला गणित फार कठीण वाटायचं, पण तू मला धीर देत म्हणायचास, “प्रयत्न करत राहा.” तुझं म्हणणं खरं होतं. प्रामाणिकपणे मेहनत केल्यावर प्रत्येक गोष्ट शक्य आहे, हे तुझ्याकडून शिकायला मिळालं. आज जे काही थोडंसं साध्य केलं आहे, त्यामागे तुझी शिकवण आहे. माझ्या बारावीच्या परीक्षेच्या वेळी माझी करून घेतलेली तयारी अजूनही आठवते . 

राजकारण , निवडणूका  आल्या की , तुझी हमखास आठवण येते . राज्यशास्त्र तुला तोंड पाठ होते  . 

काटकसर व कंजूसपणा यातला फरक तू आम्हाला समजून सांगितला होता . पैसा खर्च करताना नेहमी तुझा  चेहरा  समोर येतो . वायफळ  केलेला  खर्च तुला कधीच आवडायचा  नाही .   



तुझं प्रत्येक क्षणी  ज्ञान मिळवत  जगण्याचं तत्त्वज्ञान आजही माझ्यासाठी प्रेरणा आहे.  छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला तू मला शिकवलंस. घरात तूच सगळ्यात मोठा ,त्यामुळे आम्हाला शिक्षणाचे धडे तुझ्याकडून मिळाले . आज ही आम्ही घडयाळ बघतो त्यावेळी तुझ्याच चेहरा डोळ्यासमोर येतो . घडयाळ शिकवताना घड्याळाचे  फिरवलेले काटे  अजूनही आठवतात .  खास गोष्टी सांगताना , शिकवताना तुझ्या चेहऱ्यावर असलेला तो बालिश उत्साह—हे सगळं माझ्या मनात घर करून आहे. आयुष्य किती क्षणभंगुर आहे, हे तुझ्या जाण्यानंतर समजलं, पण त्या प्रत्येक क्षणाचं महत्त्व मला तू शिकवलं होतंस.




किरणदादा, तू घराचा  आधारस्तंभ होतास. आई-आप्पाच्या प्रत्येक गोष्टीत असलेला तुझा सहभाग, तुझी जबाबदारीने केलेली कामं—यातून कुटुंबासाठी काय करावं हे मी शिकले . तू नेहमी म्हणायचास, “आपल्या घराची , आपल्या माणसांची प्रगती झाली पाहिजे . ” आजही  आपल्या कुटुंबासाठी जे काही करते, त्यामागे तुझी प्रेरणा आहे.



माझ्या आठवणीत तू नेहमी ज्ञानदान  करताना दिसतोस. तुझ्या मोत्या  सारख्या अक्षरात लिहून ठेवलेले सुविचार  मला आजही आठवतात ,  हाताला दुखापत झालेल्या मित्राला दहावीच्या  परीक्षेत  लिखाणात तू  मदत केली होती  व तुझ्या मुळे  तो पास झाला  होता —तुझ्या या वागणुकीने मला सहानुभूती आणि इतरांसाठी काहीतरी करण्याचं महत्त्व शिकवलं. तू शिकवलेलं हे मूल्य माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं आहे.




किरणदादा, तू मला नेहमी म्हणायचास, “स्वप्नं  कधीही मोठी पाहा, पण ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.” आज जे काही लिहीते , ते तुला समर्पित आहे. तुझं ते वाक्य अजूनही माझ्या मनात आहे: “स्वप्नं ही तुमचं भविष्य घडवतात.”


दादा, तुझ्या आठवणींसोबत आयुष्य पुढे जात आहे. तुझा पांढरा  शर्ट  अजूनही आमच्या मनात जपून ठेवला आहे . तुझे ती पांढऱ्या शर्ट मधील प्रतिमा आमच्या डोळ्यासमोर जशीच्या तशी समोर दिसते  , ते  पाहून तुझं अस्तित्व जाणवतं. तुझा आवाज, तुझं हसणं, तुझ्या डोळ्यांतील चमक—हे सगळं माझ्या हृदयात कोरलं गेलं आहे. तुझ्या आठवणींनी मला अनेक वेळा धीर दिला आहे, संकटांतून बाहेर काढलं आहे.

तुझे विचार , तुझी शिकवण  माझ्या मुलाला सांगत  असते . त्यालाही ऐकायला खूप आवडते . तुझा किरण मामा  असा होता असं म्हणताना तुझी खूप आठवण येते , पण तुझे अस्तित्व आपल्या पुढच्या पिढीत अबाधित राहिलं  पाहिजे म्हणून तुझ्या नावाचा उल्लेख नेहमीच करत असते . 


तुझ्याशी शेवटचं बोलताना कदाचित पुरेसं बोलू शकले  नाही. तुला कधी सांगितलं नव्हतं की, तू माझ्या आयुष्याचा हिरो होतास. पण आज सांगते , तुझ्या विना आयुष्य अपूर्ण आहे, पण तुझ्या शिकवणुकींनी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करते  आहे.




किरण दादा, तुला मनापासून धन्यवाद देते . तू नसूनही तुझं अस्तित्व माझ्या प्रत्येक निर्णयात आहे. तुझं आयुष्य हे एका पुस्तकासारखं होतं, ज्या प्रत्येक पानावर मी काहीतरी शिकले . तुझं   नसणं  हे माझ्यासाठी मोठं दुःख होतं, पण तुझ्या शिकवणींमुळे मी आज इथे आहे.


आज माझ्या या ब्लॉग मध्ये तुझ्या आठवणी मध्ये ही पोस्ट लिहिली आहे  हे तुला कधी आवडणार नाही  हे मला माहीत आहे . आपला मोठेपणा दाखवणे म्हणजे तुझ्या शब्दात तो शहाणपणा  करण्यासारखे आहे पण  तुला काहीही वाटो  पण मी ही पोस्ट लिहाण्याचे  हेच कारण आहे की , मला माझ्या भावाचा अभिमान होता , आहे व तो कायम राहील . तू माझा  आदर्श आहेस . हे माझं प्रेमाचं प्रदर्शन नाही . तुझ्यासारखी व्यक्ति कायमच सर्वांच्या स्मरणात रहावी  हा प्रयत्न आहे . 


तू जिथे कुठे असशील, तिथे आनंदी राहा. तुझं स्थान माझ्या मनात आणि आयुष्यात नेहमीच  असेल.


तुझीच बहिण,

कृत्तिका 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template