आधुनिक त्रिपुरी पोर्णिमा |
एका गावात सुमेधा नावाची एक हुशार मुलगी राहायची. ती आधुनिक विचारांची, शिक्षणात चमकणारी आणि विज्ञानावर विश्वास ठेवणारी होती. तिची आजी कावेरी तिच्या सोबतच राहत होती आणि तिला पारंपरिक गोष्टींमध्ये खूप रस होता.
एके दिवशी कार्तिक पौर्णिमेच्या रात्री, सुमेधाच्या आजीने घरात बरीच दिवे लावली आणि मंदिरात दिव्यांची माळ लावायला तयार होऊ लागली. सुमेधाला हे सगळे पाहून उत्सुकता वाटली, कारण तिला ह्या परंपरेचे महत्त्व समजत नव्हते. तिने आजीकडे पाहत विचारले, “आजी, हे सर्व दिवे लावण्याची काय गरज आहे? आणि हे ‘त्रिपुरी वाती’ म्हणजे काय?”
आजीनं हसत तिला जवळ बसवलं आणि म्हणाली, “बाळा, ही त्रिपुरी वाती म्हणजे फक्त दिवे नाहीत, हे शिवाच्या पराक्रमाची आठवण आहे. एक गोष्ट सांगते, म्हणजे तुला समजेल.”
सुमेधाचं लक्ष गोष्टीकडे लागलं आणि ती ऐकण्यासाठी उत्सुक झाली.
आजीनं सांगायला सुरुवात केली, “खूप खूप वर्षांपूर्वी त्रिपुरासुर नावाचे तीन भाऊ होते - विद्युन्माली, तारकाक्ष, आणि कमलाक्ष. त्यांनी कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं होतं की त्यांच्या तीन वेगवेगळ्या नगरांना कधीही कोणत्याही सामर्थ्याने नष्ट करता येणार नाही. या नगरांना ‘त्रिपुर’ असं म्हटलं जायचं. त्रिपुरासुरांनी हे वरदान मिळवल्यावर, त्यांनी आपल्या अजेय शक्तीचा वापर करून संपूर्ण जगावर अत्याचार सुरू केला. देवता आणि साधू-संत त्रासले. अखेर त्यांनी भगवान शिवाकडे मदतीसाठी याचना केली.”
सुमेधाला गोष्टीतली कुतूहल वाढली. तिने विचारलं, “मग शिव काय करणार होते, आजी?”
आजीनं पुढे सांगितलं, “भगवान शिवाने त्यांच्या अत्याचारांचा अंत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक शक्तिशाली बाण तयार केला आणि त्याच क्षणी तीन नगरांचा संहार केला, ज्यामुळे त्रिपुरासुराचा अंत झाला. हा पराक्रम अंध:कारावर प्रकाशाच्या विजयाचं प्रतीक मानला जातो. म्हणूनच त्या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते, आणि त्रिपुरी वाती लावून अंध:काराचा नाश केल्याचा उत्सव साजरा केला जातो.”
सुमेधाला अद्याप थोडं समजलं नव्हतं. तिने विचारलं, “पण आजी, आपण आजच्या काळात हे सगळं का करतो? त्रिपुरासुर तर आता अस्तित्वात नाही.”
आजीनं हसून उत्तर दिलं, “हो बाळा, त्रिपुरासुर नसला तरी, अज्ञान, अहंकार, आणि स्वार्थाचे त्रिपुर आजही आपल्या मनात असू शकतात. त्रिपुरी वातीचा अर्थ आहे, आपल्या अंत:करणातल्या या त्रिपुराचा नाश करून त्यात ज्ञानाचा आणि शांततेचा प्रकाश आणणे. हे दिवे फक्त शिवाच्या विजयाचा नाही, तर आपल्या जीवनातला प्रकाश जागृत करण्याचं प्रतीक आहेत.”
सुमेधाला हळूहळू याचा अर्थ उमजायला लागला. आजी पुढे म्हणाली, “आपण ही दिव्यांची माळ लावतो, म्हणजे आपल्या मनातल्या अंधाराचा आणि नकारात्मक विचारांचा नाश करू, आणि प्रेम, एकता, आणि शांतीचा प्रकाश पसरवू. त्रिपुरी वाती लावण्याचं कारण म्हणजे केवळ एक परंपरा नव्हे, तर आपल्या मनात सकारात्मकता जागवणं.”
सुमेधानं विचारात पडून विचारलं, “म्हणजे आपणही शिवासारखेच आपल्यातले त्रासदायक विचार नष्ट करू शकतो का?”
“हो, अगदी बरोबर!” आजीनं उत्तर दिलं. “त्रिपुरी वाती लावून आपण प्रतिज्ञा करतो की अज्ञान, अहंकार, आणि स्वार्थाचं त्रिपुर आपल्या मनात येऊ देणार नाही. आणि त्यामुळेच आपल्या जीवनात सुख, शांती, आणि आनंद पसरतो.”
सुमेधाला या गोष्टीचा अर्थ समजला. तिनं आजीसोबत त्रिपुरी वाती लावली आणि आपल्या मनातील त्रिपुरांचा नाश करण्याची प्रतिज्ञा केली.
सुमेधा एव्हडच करून थांबली नाही तर सोशल साइट वरती याचा प्रचार सुरू केला . वाती प्रज्वलित करताना फोटो काढले . वात कशी बनवायची याचे प्रशिक्षण सर्वाना दिले . तरुण पिढीने या परांपरचे पालन करावे यासाठी त्यांच्या मनातील शंकेचे निरसन करण्यासाठी आजीच्या मदतीने प्रश्नावली तयार केली व त्याची उत्तरे लिहून छान ब्लॉग व व्हिडिओ बनवला .
सर्वांच्या शंकेचे निरसन झाले व सर्वानी या वर्षी त्रिपुरी वाती लावून कार्तिक पौर्णिमा साजरी केली
हा सुमेधाचा उपक्रम प्रशंसनीय होता . हा ब्लॉग खालील प्रमाणे होता .
कार्तिक पौर्णिमेची दिवशी देव दिवाळी का साजरी केली जाते ..?
तारकासुर नावाच्या असुराची. त्याला तीन मुले होती – ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली. त्या तिघांनी एक एक नगरी अर्थात ‘पूर’ वसवले होते. देवासुरांच्या युद्धात शंकराने या असुरांना त्यांच्या तीन पुरांसकट नष्ट केले. तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा. शंकरची म्हणजे ‘तीन पुरांच्या अरीची’ ही ‘त्रिपुरारी’ पौर्णिमा. असुरांच्या जाचातून सुटल्याने आनंदलेल्या देवांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली! म्हणूनच या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते.
कार्तिक पौर्णिमेची दिवशी कार्तिक स्वामीचे दर्शन का घेतले जाते ..?
तारकासुराने ब्रह्माकडून ‘अमर’ होण्याचा वर मागितला होता. ब्रह्मा म्हणाला, “असे काही मी देऊ शकत नाही. तू दुसरे काहीतरी माग.” तेंव्हा त्याने, “मला शिवाच्यापुत्राकडून मृत्यू येवो.” असे मागितले. त्यावेळी सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मदहन केले होते. आणि शंकर अत्यंत दु:खी होऊन कित्येक वर्ष समाधी लावून बसले होते. या वराने तारकासुर जवळ जवळ अमर झाल्यासारखाच होता. पुढे पार्वतीची तपश्चर्या, शिव-पार्वती विवाह आणि कार्तिकेयचा जन्म झाला. आणि तारकासुराचा वध कार्तिकेयने केला. कार्तिकी पौर्णिमेला कार्तिकेयाचे दर्शन घेण्याची पद्धत आहे.
कार्तिक पौर्णिमेची दिवशी त्रिपुरी वाती म्हणजे काय व त्या का लावाव्यात ..?
त्रिपुर वात ही नेहमीच्या इतर वातींपेक्षा थोडी वेगळी असते . एरवी आपण दोन वाती एकत्र करून दिवा लावतो. पण त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी जी त्रिपुर वात लावली जाते त्यासाठी तब्बल ७५० दोरवाती एकत्र करून लावल्या जातात.
कार्तिक पौर्णिमेची दिवशी त्रिपुरी वाती साडेसातशेच का लावल्या जातात ...?
साडेसातशे म्हणजे पूर्णता: साडेसातशे ही संख्या एक पवित्र संख्या मानली जाते. भारतीय शास्त्रांनुसार, 7 ही संख्या अत्यंत शुभ मानली जाते, आणि ती पूर्णतेचा, समृद्धीचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा प्रतीक आहे. त्यामुळं साडेसातशे वाती लावणे म्हणजे भक्ताच्या जीवनात पूर्तता, शांती आणि उन्नती येईल असा विश्वास आहे.
साडेसातशे वाती लावणे हे केवळ एक धार्मिक कृत्य नाही, तर त्याद्वारे व्यक्तीच्या जीवनात अंधकाराचा नाश होऊन ज्ञान आणि सकारात्मकतेचा प्रकाश येईल असा विचार असतो.
खूप छान माहिती आजींनी नातवाला सांगितली आहे.
उत्तर द्याहटवाखुप छान माहिती पर कथा .. धन्यवाद 🙏
उत्तर द्याहटवा