सोनालीने निराश होऊन हातातील फोन खाली ठेवला . मागच्या दोन दिवसापासून तिचं हेच चालू होतं . समोरचा माणूस असे काही कारण सांगत होता की , ती पुढे काहीच बोलू शकत नव्हती . भारतात येण्या अगोदार म्हणजे एक महिना अगोदर तिने तयारी केली होती . पाच जानेवारी रोजी गेट टुगेदर ठरवताना तिने सर्वाना विचारले होते . त्यावेळी सर्वानी संमती दिली होती . त्यावेळी सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता . कधी तो दिवस उगवतो व या निमित्ताने सोनालीच्या सह्या घेतो असे सर्वाना वाटत होते . एकदा सोनालीने सही केली, की आपण वाडा विकायला मोकळे झालो असे सर्वांना वाटत होते .
हे नियोजित गेटटुगेदर म्हणजे सोनालीने आपला वाडा वाचवण्यासाठी केलेला शेवटचा प्रयत्न होता.
परदेशात, आपल्या माणसांपासून दूर राहिल्यानंतर तिला खरी आपल्या माणसांची ओढ निर्माण झाली होती . आपल्या जुन्या वाड्यात शेवटचे सर्वांनी भेटावे असे तिला वाटत होते .
वाड्याच्या आता वाटण्या होणार होत्या. प्रत्येकाला या वाड्यामध्ये हिस्सा हवा होता. वाडा विकायचा व त्यातील पैश्याने फ्लॅट विकत घेण्याचे स्वप्न सर्वजण पहात होते .
आज आलेला हा दहावा कॉल होता . प्रत्येक कॉल मध्ये उत्तरं ठरलेलीच होती –
“अगं, बाई किती कामं आहेत, सुट्टीच मिळत नाही.”
“मुले परीक्षेच्या तयारीत आहेत.”
“प्रवासात वेळ जातो गं.”
कश्याला परत त्या जून्या वाड्यात भेटायचे, त्यापेक्षा आपण एक हॉटेल बुक करू. आपण सर्वजण तिथेच भेटू .
हे ऐकून सोनालीच्या मनात आलं , ‘हेच का आपलं नातं? कारणं शोधण्यासाठी भेटायचं पण भेटण्याची ओढ मात्र नाही. आपला वाडा म्हणजे फक्त दगड-मातीने बनलेली ईमारत आहे का..? काम झाले की विकून टाकायला…सोनलीला मनोमन खूप वाईट वाटले होते.
प्रत्येकाला कामं असतात पण आपल्या प्रेमाच्या नात्यांची वीण घट्ट करायची असेल तर आपण एकत्र येणे महत्वाचे आहे . वाडा पडण्यागोदार आपला वाडा डोळे भरून बघितला व तिथल्या प्रत्येक वस्तूला मायेचा स्पर्श झाला तर आपण आनंदाने या जगाचा निरोप घ्यायला आपण मोकळे होवू असे सोनाली ला वाटत होते . या आपल्या भावना कश्या मांडायच्या असा विचार ती करत होती त्यावेळी सोनालीच्या मनात एक कल्पना आली. तिने सगळ्यांना हस्तलिखित एक गोड चिठ्ठी पाठवली:
प्रिय कुटुंबीय,
एक विचार करा, आज आपण एकमेकांसाठी वेळ काढला नाही, तर ही वेळ पुन्हा येईल का..?
सही करण्यापूर्वी आपण आपला वाडा आपण डोळे भरून पाहू या ..चला, एकत्र येऊन जुन्या आठवणींना नव्या गप्पांमधून फुलवूया.
आणि हो, नात्यांमध्ये दूर राहणं कधीच उत्तर नाही, कारण प्रत्येकाचं स्थान अमूल्य आहे. आपली ही पिढी मागच्या व पुढच्या पिढीला बांधून ठेवणारा दुवा आहे . आपली नाती अजूनही घट्ट बांधली गेली आहेत ही सांगणारी आपली ही भेट असणार आहे .
तुमचं यायचं नक्की करा, कारण आपले हे गेट टुगेटर झाले तरच मी सही करणार आहे .
तुम्हाला जमत नसेल तर शेवटचे सांगा म्हणजे मी अमेरिकेला जायला मोकळी आहे.
तुमचीच सोनाली
ही चिठ्ठी वाचून सगळ्यांना धक्का बसला. या वेळी सोनालीची सही झाली नाही तर परत वर्षभर या वाड्याचे काहीच होणार नाही म्हणून नाईलाजाने सर्वजण यायला तयार झाले .
“सीधे उंगलीसे घी नही निकले , तो उंगली तेढी करणी पडती है”
ही म्हण मनात येऊन सोनाली मनोमन खुश झाली .
सगळेजण नियोजित वेळी एकत्र जमले.
रविवारी सकाळी सर्वजण वाड्यात जमले. सुरुवातीला वातावरण थोडं गार होतं. सगळे औपचारिकतेत अडकले होते. वाड्यातील धूळ भरलेल्या वस्तू पाहून काहीजण चिडचिड करत होते. पण नंतर जेव्हा त्यांनी जुन्या वस्तू हातात घेतल्या, तेव्हा आठवणींच्या लहरी चालू झाल्या.
मीरा जुन्या कपाटातून काढलेल्या आईच्या साडीला स्पर्श करून भावूक झाली. “अगं, हिच साडी आई मला वाढदिवसाला नेसवायची. किती सुंदर वाटायचं तेव्हा!” ती म्हणाली.
अनुराधाने जुन्या स्वयंपाकघरात एक मातीचं भांडं उचललं आणि म्हणाली, “ह्याच्यात आईच्या हातचं बासुंदीचं जादू होतं. त्याची सर अजून कशालाच नाही.”
शरदने हसत जुन्या पलंगाखाली पाहिलं आणि तिथून खेळण्याचा एक डबा काढला. “हा बघा! आपण लहानपणी किती भांडायचो यावर. शेवटी हे खेळणं कोणाचं ते आई ठरवायची.” सगळे हसू लागले.
दुपारच्या जेवणाची वेळ झाली पण कॅटरिंग वाला आलाच नाही . सर्वांची चिडचिड झाली. सोनलीला सर्वजण बोल लावत होते .
नाईलाजाने दुपारी सगळ्यांनी मिळून जेवण बनवायचं ठरवलं. प्रत्येकाने आपली जबाबदारी घेतली – अनुराधाने पुरणपोळ्या लाटल्या, मीरा भाज्या कापायला बसली, संजीवने चुल पेटवली, आणि शरदने वरण बनवलं. सोनाली मात्र त्यांच्यात होणारा संवाद कुतूहलाने ऐकत होती.सगळ्यांच्या सामंजस्याने स्वयंपाकाचा सोहळा झाला. जेवताना गमतीजमती सुरू झाल्या.
“शरद, अजूनही वरणाला मीठ कमी टाकतोस का? लहानपणीही असंच होतं,” संजीवने चिडवलं.
“आणि अनुराधा, तुझ्या पोळ्यांना गोल आकार कधी मिळणार?” मीरा खिदळली.
सगळे जोरजोरात हसत होते. त्या हास्याने वाड्यातील शांतता मोडली आणि त्या क्षणी वाडा पुन्हा जिवंत झाला.
संध्याकाळी वाड्याच्या ओसरीवर सगळे चहाचा कप घेऊन बसले. शरदने म्हटले, “आपण सगळे इथे एकत्र आहोत, यामुळे मला खूप समाधान वाटतं. आपण किती लांब गेलो होतो, पण आज कळलं की आपलं नातं तसंच आहे – फक्त थोडं लक्ष हवं.”
अनुराधाने डोळे पुसले आणि म्हटलं, “हो ना, लहानपणी आपल्याला कुटुंबाशिवाय दुसरं काही महत्त्वाचं वाटायचंच नाही. पण मोठं झाल्यावर आपल्या आयुष्याचं केंद्र बदललं.”
मीरा म्हणाली, “पण आज जाणवलं की आपल्या गप्पा, भांडणं, आणि प्रेम हेच खरे संपत्ती आहे. उगाच आपण पैसे कमवण्यात अडकतो.”
त्याच गेट-टुगेदरमध्ये सगळ्यांनी ठरवलं की दरवर्षी एक दिवस कुटुंबासाठी राखून ठेवायचा. “जुने क्षण परत आणता येत नाहीत, पण नवीन आठवणी नक्की तयार करू शकतो,” शरदने ठामपणे सांगितलं.
प्रत्येक वर्षी भेटण्यासाठी हक्काची जागा तर हवीच म्हणून वाडा विकण्याचा प्रस्ताव स्थगित करण्यात आला. वाड्याचे नूतनीकरण करून परत सर्वांनी इथेच जमायचे असे ठरले .
त्या दिवशी नुसता गेट-टुगेदर झाला नाही, तर तुटलेले नातेही पुन्हा जुळले. प्रेमाच्या बंधांनी त्यांना पुन्हा एकत्र आणलं. वाड्यातून परतताना प्रत्येकजण समाधानाने भरून गेला, आणि त्यांचं नातं आता अधिक मजबूत झालं होतं.
त्या दिवशी सोनाली मनातल्या मनात बोलली , “शंभर कारणं दिली जातात दूर राहण्यासाठी, पण एका प्रेमळ कारणासाठी माणसं एकत्र येतात.”
ते फॅमिली गेट टुगेदर एक सुंदर आठवण ठरलं – नात्यांची वीण पुन्हा घट्ट करणारी!
“हक्काचा हा गोतावळा, नात्यांचे हे देणे,
आठवणींच्या साठ्याला, आज पुन्हा एकत्र येणे।
शंभर कारणे देतील दूर राहण्यासाठी,
पण एकच कारण पुरे, नाती जपण्यासाठी!”
कृतिका कुलकर्णी
मस्त अचूक माहिती
उत्तर द्याहटवा