मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

शुक्रवार, ११ एप्रिल, २०२५

नव्याने जन्म दिला

 



आज ज्योतीताई  नाराज होत्या . प्राजक्ताच्या  कालच्या तुटक वागण्याचा विचार काही केल्या त्यांच्या डोक्यातून जात नव्हता  . मुली प्रमाणे प्रेम करणारी प्राजक्ता माझ्याशी अशी का  वागली असेल …? ती अशी कधी वागेल  असा विचारही  केला नव्हता. 

"आई तुम्ही घरात नसाल  तर घर भकास वाटते ,तुम्ही आम्हाला सोडून कोठेच जायचे नाही " असा आग्रह करणारी सून काल रागातच म्हणाली ," आई, तुम्ही दोन दिवस मामाकडे  रहायला जा . माझ्या मैत्रिणी किटी  पार्टी साठी  येणार आहेत  .  तुमची लुडबूड मला नको आहे . तुम्ही असाल तर आम्हाला ओकवर्ड  होईल  ."  हातात बॅग देत  नवऱ्याला  घेऊन  जाण्याची खून केली . 

तिच्या अश्या  बोलण्याचा, वागण्याचा  माझ्यावर काय परिणाम होईल याचा विचारही तिने केला  नाही .   मागच्या वेळी नंदनबाई बोलल्या होत्या ," सुनेला खूपच डोक्यावर चढवून ठेवले आहेस . कितीही प्रेम लाव , सून ती सूनच  असते बरं ."

ज्योती ताईच्या  डोक्यात विचाराचे चक्र चालू होते . आपल्या या प्रेमळ नात्याला कोणाची दृष्टतर  लागली नसेल  ना .. माझी सून अशी वागूच शकत नाही असा  विचार करत होत्या पण दुसरे मन  म्हणाले ," आज तुझा वाढदिवस आहे , हे पण ती विसरली . मुला पासून तोडण्याचा कट  करतेय  ती .."

ज्योती ताईने कानावर हात ठेवले व विचार करणेच सोडून दिले . भावाकडे आल्यापासून त्यांचे कश्यातच लक्ष लागत नाही हे भावाने व  भावजाईने  ओळखले होते . 

संध्याकाळी भावाने सांगितले , " आज माझ्या मित्राकडे पार्टी आहे तुलापण त्याने आग्रहाने बोलावले आहे . चल लवकर तयार हो .. आणि हो मी तुझ्या आवडीच्या पिवळ्या रंगाची साडी  ठेवली आहे तिच नेस .."

ज्योतीताईची  पार्टीला जाण्याची अजिबात ईछ्या नव्हती पण डोक्यात विचाराचे काहूर माजवण्या पेक्षा पार्टीला जाणे त्यांनी  पसंद केले . 

रिक्षाचे पैसे भावाने दिले व फोन करून सांगितले आम्ही पोहचलो आहोत . फोन करून आपण बाहेर पोहचलो आहोत हे भावाचे सांगणे खटकले पण काहीच न बोलत  ज्योतीताई भावासोबत निघाल्या  . हॉटेलच्या दुसऱ्या माळ्यावर पोहचताच भावाने  आपल्या बहिणीला पुढे केले व  काचेचा दरवाजा उघडताच  डोक्यावर पुष्प वृष्टी  झाली . काय झालं हे कळायच्या अगोदर " एकसष्ट वर्षाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या " असा  जोरात आवाज ऐकायला आला . ज्योति ताई चक्रावून गेल्या . धूरातून  वाट काढत , सेलिब्रेटी प्रमाणे  एंट्री झाली . आपण स्वप्नात आहोत का  हे तपासून पाहण्यासाठी ज्योतीताईने  स्वतःला चिमटा  काढला .   

दिवे लावून औक्षवण करण्यात आले . केक कापला  , प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले . ज्योतीताईच्या  डोळ्यात आनंदाश्रू ओसंडून वाहत होते . या भाऊक स्थितीत आई काहीच बोलू शकणार नाही म्हणून कार्यक्रमाची सांगता  करत होते तेवढ्यात ज्योती  ताई  बोलल्या , मला दोन शब्द बोलायचे आहेत .. 

"सर्व प्रथम सर्वाना धन्यवाद .  मी प्राजक्ताची माफी मागते . तुझ्या बद्दल मी गैरसमज करून घेतला होता . तू इतके छान सरप्राइज मला दिले मात्र मी तुझ्या वागण्याचा संशय घेतला . माणसाची एखादी वाईट कृती कळत  नकळत घडते पण तिच बाजू आपण पकडून ठेवतो व मागच्या चांगल्या कृत्याचा आपल्याला विसर पडतो . असेच काहीसे माझ्या बाबतीत झाले पण आज त्याची मी कबुली देते . 

 तुझ्या सारखी सून  फक्त  मलाच प्रत्येक जन्मी मिळो असे नाही तर प्रत्येक सासुला  मिळो  ही ईश्वर चरणी प्रार्थना करते .

आज माझा ६१ वा वाढदिवस. वाढदिवस म्हटलं की आधी वाटायचं की वय वाढलं, आता काही नव्याने करायचं उरलं नाही. पण गेल्या वर्षभरात माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. मला वाटतं, वय काहीही असो, शिकण्याची आणि जगण्याची उत्सुकता असेपर्यंत माणूस खऱ्या अर्थाने “जिवंत” असतो.


 मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले. लहानपणी शिकायची फार आवड होती, पण तेव्हा घरची परिस्थिती ठीक नव्हती  व  तो काळ मुलीचे   लग्न ठेवून शिक्षण घ्यावा असा नव्हता . बारावी  नंतर माझे शिक्षण  बंद झाले  .  घरकामाकडे विशेष लक्ष दिले  .  तेव्हा शिक्षणबद्दल विशेष काही वाटले नाही, पण जसजसं वय वाढत गेलं, शिक्षणाची ओढ अधिक तीव्र होत गेली. लग्न झालं, संसार सुरु झाला, मुलं झाली… आणि मी त्या सगळ्यात माझी शिकण्याची ओढ कुठेतरी गाडून टाकली. 


मुलं मोठी झाली, त्यांच्या जबाबदाऱ्या पार पडल्या, आणि मी हळूहळू निवांत होऊ लागले. पण मनात एक खंत होती – “मी काय मिळविलं? मी काय केलं माझ्या स्वतःसाठी?” 

सगळं करताना स्वतःला हरवून बसले होते. प्रसादचे लग्न झाले . प्राजक्ताने या घरात  लक्ष्मीच्या  रूपाने प्रवेश केला   


माझी सून, प्राजक्ता – देवाने  पाठवलेली एक देणगीच आहे. ती माझ्या मनाच्या अगदी जवळची , जणू माझा  पोटाचा गोळा आहे . आम्ही मैत्रिणी प्रमाणे गप्पा मारतो .  तिच्यासोबत गप्पा मारताना मी एकदा सहज म्हटलं, “अगं, मला शिकायची खूप आवड होती पण तो काळ मुलींच्या शिक्षणाला मदत करणारा  नव्हता. आता  उच्च शिक्षण घेणे  पुढच्याच जन्मी शक्य आहे .”

ती हसली आणि म्हणाली, “आई, शिकायला वय लागत नाही. तुम्ही ठरवा तुम्हाला  काय शिकायचं आहे , बाकी मी आहेच!”

त्या दिवशी तिच्या डोळ्यातल्या विश्वासामुळे मी ठरवलं – “आपण पदवी घेतल्याशिवाय आता शांत बसायचं नाही!”


५५  व्या वर्षी मी पुढील शिक्षणासाठी अर्ज केला. सुरुवातीला फार घाबरले होते. अभ्यासाच्या पुस्तकांकडे बघून डोकं गरगरायला लागायचं. पण प्राजक्ताने मला फारच माया आणि धैर्याने सांभाळलं.

दररोज ती माझ्यासोबत बसायाची व माझा  अभ्यास घ्यायची. मी विसरले तर हसून समजवायची, कंटाळा आला तर म्हणायची, “आई, थोडंच राहिलंय. बघा ना, तुम्ही करू शकता!”


आणि खरंच, त्या विश्वासाने मी करत गेले.

घरातली कामं सांभाळून, संध्याकाळी अभ्यास, रात्री जागरण करून लिखाणाचा सराव केला  – सगळं करून, अखेर मी परीक्षा दिली.


परीक्षेच्या दिवशी प्राजक्ताने माझी  फक्त बॅगच  भरला नाही, तर चक्क स्वतः ताटात जेवण वाढून मला घास भरवला  . म्हणाली, “आज तुमचा पेपर आहे , तुम्ही पोटभर जेवण करा  पोटात अन्न असेल तरच तुम्हाला लिहता  येईल . काही काळजी करू नका तुम्ही  फक्त उत्तम लिहा, बाकी सगळं मी बघते!”

तो क्षण मी कधीच विसरणार नाही. डोळ्यांतून पाणी आलं होतं, पण मी तिला काही बोलले नाही – फक्त मनातून तिचे  आभार मानले.


आज मी पदवीधर आहे. मी माझ्या नावासमोर “B.A.” लावते आणि अभिमानाने म्हणते – “हो, मी ६० व्या वर्षी पास झाले!”

किती तरी लोक म्हणायचे, “आता काय गरज आहे शिक्षणाची? पदवी घेऊन तुला आता नोकरी मिळणार आहे का ? म्हातारपणी  जपमाळ घेऊन देवाचे नाव घ्यायचे सोडून , अभ्यास करत बसली आहे ..” पण मला वाटतं, शिक्षण म्हणजे गरज नाही – ते तर आत्मसन्मानाचं, आत्मविश्वासाचं माध्यम आहे. 

मी इतरांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले . पाठीशी माझी प्राजक्ता होतीच . 

तिच्या पाठिंब्यामुळे माझा नव्याने जन्म झाला आहे असे वाटते . 

हा नवीन जन्म मला माझ्या सुनेने दिला आहे . 


आता माझं स्वप्न आहे – गावातल्या महिलांसाठी एक अभ्यासवर्ग सुरु करायचा. जे ज्या वयात शिकू शकल्या नाहीत, त्यांना पुन्हा शिकायची संधी द्यायची. मी त्यांच्यासाठी एक उदाहरण बनायचं ठरवलंय.


आज ६१ व्या वाढदिवसाच्या दिवशी, ज्योती ताई ने प्राजक्ताला मिठी मारली आणि भरलेल्या डोळ्याने  तिच्या कानात बोलल्या , “हे सगळं तुझ्यामुळेच शक्य झालं गं!”

ती हसली आणि म्हणाली, “आई, हे सगळं तुमच्यामुळे झालं. कारण तुम्ही ठरवलं… आणि ते पूर्ण केलं!”


माझ्या आयुष्यात नवीन वळण आलेलं आहे. आता मी अधिक आत्मविश्वासाने जगते. माझ्या शेजारीणबाई विचारतात, “ज्योती, आता काय पुढचं?”

मी हसते आणि म्हणते, “आता शिक्षिकाच व्हायचं!”


कारण स्वप्नं पाहायची असतात – पूर्ण वयभर.

शिकण्याची आणि स्वतःसाठी काही करण्याची हीच खरी वेळ आहे – आता आणि इथेच!"

ज्योती ताई ने परत एकदा सुनेला मिठी मारली . दोघी  हसत एकमे एकीनचे  अश्रु पुसत होत्या

आपल्या समाजाला अश्या  सासू - सुनेची गरज आहे ज्या   एकमे एकीना नव्याने जन्म देतील 

चारचौघात एकमेकीणचा सन्मान करतील . कौतुक केल्याने प्रेम वाढते . कौतुकात खूप शक्ति असते हे विसरु नका   



६ टिप्पण्या:

comment

नक्की वाचा

सेकंड ओपेनियन

  आज  व्हॉटस अप्प वरती फिरणारा लेख वाचनात आला .  व्यंकटेश माडगूळकरांच्या पुस्तकांचा संदर्भ देणारा लेख होता . या लेखामध्ये आपले सेकंड ओपेनियन...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template